उजनी (जिल्हा सोलापूर) धरणातील प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी !

हिंदु जनजागृती समितीचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन देतांना  श्री. विक्रम घोडके आणि अन्य कार्यकर्ते

सोलापूर, ७ जून (वार्ता.) – वर्ष २०२१ मध्ये उजनी धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये ‘फेकल केलिफॉर्म’ हे जिवाणू आढळले आहेत. या धरणामध्ये सांडपाणी सोडण्यावर प्रतिबंध करण्यात यावा. या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून सहस्रो नागरिकांच्या जिवावर बेतलेल्या या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे ६ जून या दिवशी निवेदनाद्वारे केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, सनातन संस्थेचे श्री. आनंद खजुर्गिकर, सौ. निलिमा खजुर्गिकर, सौ. मनीषा पत्की, तसेच श्री. संदीप ढगे आदी उपस्थित होते.

उजनी धरणाच्या प्रदूषणाचा विषय अधिवेशनामध्ये उपस्थित करीन ! – सचिन कल्याणशेट्टी, आमदार, भाजप

या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, ‘‘उजनी धरणाच्या प्रदूषणाचा विषय महत्त्वाचा आहे. याचा मी अभ्यास करून अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करेन. हिंदु जनजागृती समितीचे कार्य ही काळाची आवश्यकता आहे.’’

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी देऊ न शकणारे प्रशासन जनताद्वेषी !