भारतीय चलनावर प्रथमच दिसू शकतात टागोर आणि कलाम यांची छायाचित्रे !

चलनावर सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांचीही छायाचित्रे छापण्याची सामाजिक माध्यमांद्वारे मागणी !

नवी देहली – भारतीय चलनावर म. गांधी यांचे छायाचित्र आहे; पण लवकरच त्यावर रवींद्रनाथ टागोर आणि देशाचे ११ वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची छायाचित्रे दिसू शकतात. एका वृत्तानुसार केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रुपयांच्या नोटांच्या मालिकेवर कलाम अन् टागोर यांची चित्रे छापण्याचा विचार करत आहे.

रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या ‘गीतांजली’ या काव्यात्मक रचनेसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते, तर एपीजे अब्दुल कलाम हे देशातील महान वैज्ञानिक आणि आदर्श व्यक्तीमत्त्वांपैकी एक होते. त्यासाठी त्यांची छायाचित्रे चलनावर छापण्यात येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास रुपयावर म. गांधी यांच्या व्यतिरिक्त इतरांची छायाचित्रे छापण्याची रिझर्व्ह बँकेची ही पहिलीच वेळ असेल. वर्ष १९६९ मध्ये गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रिझर्व्ह बँकेने १०० रुपयांच्या नोटेवर सर्वप्रथम म. गांधी यांचे छायाचित्र छापले होते.

क्रांतीकारक सुभाषचंद्र बोस आणि सरदार भगतसिंह यांची छायाचित्रे भारतीय चलनावर छापण्याची मागणी सामाजिक माध्यमांवरून होत आहे.