तुर्कस्तानानंतर आता इजिप्तचाही भारताच्या गव्हाची खेप घेण्यापासून नकार !

नवी देहली – तुर्कस्तानानंतर आता इजिप्तनेही भारताची ५५ सहस्त्र टन गव्हाची खेप घेण्यापासून नकार दिला आहे. जी खेप तुर्कस्तानने घेतली नाही, तीच इजिप्तकडून आलेल्या मागणीमुळे तिकडे वळवण्यात आली होती. तुर्कस्तानने भारतीय गव्हामध्ये ‘रुबेला’ विषाणु असल्याचा अपप्रचार करत तो घेण्यास नकार दिला होता. मुळात तुर्कस्तानला पाठवण्यात आलेला गहू थेट भारताकडून गेला नव्हता, तर भारतीय आस्थापन ‘आयटीसी लिमिटेड’कडून तो नेदरलँड्सहून तुर्कस्तानला पाठवण्यात आला होता. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

अन्य एका वृत्तानुसार, भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, भारत गव्हाची निर्यात पूर्ण होण्यासाठी इजिप्तच्या ‘कस्टम क्लियरंस’ची वाट पाहील. याआधी तुर्कस्तानकडून भारताच्या गव्हाला परत पाठवण्यावरून खाद्य सचिव सुधांशू पांडेय म्हणाले होते की, गव्हाची खेप पाठवण्याआधी अलगीकरण आणि अन्य आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. तुर्कस्तानच्या अधिकार्‍यांसमवेत अजून प्रत्यक्ष चर्चा झालेली नाही.

गहू निर्यातीसंदर्भात इजिप्तची प्रत्यक्ष स्थिती !

इजिप्त हा जगातील सर्वाधिक गहू आयात करणारा देश आहे. मे मासात इजिप्तचे अन्नपुरवठा मंत्री अली मोसेलही यांनी भारताशी ५ लाख टन गहू खरेदी करण्याचा करार केला होता; परंतु यावर अद्याप स्वाक्षर्‍या झालेल्या नाहीत. याआधी एप्रिल मासात इजिप्तच्या कृषी मंत्रालयाने भारताकडून गहू आयात करण्यास अनुमती दिली होती.

भारतीय गव्हाला प्रचंड मागणी !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांतील खाद्यपदार्थांच्या निर्यातीवर बंधने आली असल्याने सर्वत्र महागाई वाढली आहे. युरोपीयन युनियनच्या गव्हाची किंमत ४३ रुपये प्रतिकिलो आहे, तर भारतीय गहू आंतरराष्ट्रीय बाजारात २६ रुपयांना मिळत आहे. त्यामुळे भारताच्या गव्हाला प्रचंड मागणी आहे. भारताने त्याच्या नागरिकांना गहू न्यून पडू नये, यासाठी निर्यातीवर आधीच बंदी आणली असली, तरी इजिप्तशी करार करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांचे भारताविरुद्ध षड्यंत्र ! आता भारतानेही अशा देशांकडून आयात होणार्‍या वस्तूंवर बंदी घातली पाहिजे !