आयुर्वेदाला पुनर्वैभव मिळण्यासाठी समर्पित भावनेने काम करा !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन !

भगतसिंह कोश्यारी

 

पुणे – आयुर्वेद ही एक साधना आहे. हे ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून त्यासाठी अनुभवाचे ज्ञानही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. आयुर्वेदाचा प्रसार – प्रचार केल्याविषयी ‘परिवर्तन’ संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ. सुभाष रानडे आणि डॉ. सुनंदा रानडे यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते ‘परिवर्तन आयुर्वेद जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

पत्रकार भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘सिंबॉयोसिस’चे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, नॅक राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, ‘परिवर्तन’चे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर, सचिव स्वरूपा गुजर आदी उपस्थित होते.

१. राज्यपाल श्री. कोश्यारी पुढे म्हणाले की, योग आणि आयुर्वेदाचे भारतीय ज्ञान जगाला मार्गदर्शक आहे. हे ज्ञान अनुभवसिद्ध आणि उपयुक्त आहे. आपण आयुर्वेदीक उपचारपद्धतीवर विश्वास ठेवायला हवा. निसर्गाने दिलेल्या या अद्भूत देणगीचा उपयोग रोगोपचारासाठी करायला हवा. आयुर्वेदाच्या अभ्यासकांनी संस्कृत अध्ययनाकडेही लक्ष द्यावे. आयुर्वेदाचे अध्ययन आणि अनुसरण आरोग्यशास्त्रात क्रांती घडवून आणेल. आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासन सर्व सहकार्य करण्यास सिद्ध आहे, असे आवाहनही श्री. कोश्यारी यांनी केले.

२. डॉ. सुभाष रानडे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, जगभरातील व्यक्तींनी भारतात येऊन आयुर्वेद शिकायची इच्छा व्यक्त केल्याने आंतरराष्ट्रीय अकादमी स्थापन केली.

३. डॉ. मुजुमदार म्हणाले की, यापुढील काळात आरोग्य विज्ञान क्षेत्रात कोणतीही एक शाखा स्वतंत्र ठेवण्यापेक्षा विविध शाखा एकत्र करून रुग्णांना चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयोग करण्याची आवश्यकता आहे.