शेती ‘साधना’ म्हणून केल्याने देवाचे साहाय्य मिळून शेतात अपेक्षेहून अधिक फलप्राप्ती होते, हे अनुभवणारे पू. शंकर गुंजेकर !

श्री. शंकर गुंजेकरमामा (आताचे पू. शंकर गुंजेकरमामा) यांची शेती आहे. ‘ते त्यांची शेती साधना म्हणून करत असल्याने त्यांना देवाचे साहाय्य मिळते’, हे दर्शवणाऱ्या काही अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प्रत्येक कृती करतांना प्रार्थना आणि नामजप केल्याने कामे अल्प दिवसांत होणे !

पू. शंकर गुंजेकर

‘देवा, तू दिलेली सेवा माझ्याकडून साधना म्हणून होऊ दे,’ अशी देवाला प्रार्थना करून शेतातील भूमी नांगरतांना पू. मामा शेताकडे जायला निघतात. ते भूमातेलाही प्रार्थना करतात. प्रार्थना केल्याविना ते कधीच शेताकडे जात नाहीत. ते नामजप करत बी पेरतात. प्रत्येक रोप ते नामजप करत लावतात. त्यामुळे शेतातील कामे नियोजनाप्रमाणे आणि अल्प दिवसांत पूर्ण होतात.

प्रत्येक वस्तू कृतज्ञताभावाने हाताळतात !

पू. मामा शेतात लागणारी प्रत्येक वस्तू कृतज्ञताभावाने हाताळतात, तसेच लागणाऱ्या सर्व वस्तू, अवजारे आदी योग्य पद्धतीने ठेवतात. त्यामुळे ती व्यवस्थित राहून पुढच्या वर्षीही नीट वापरता येतात.

‘पिकाची राखण देवच करणार’, अशी श्रद्धा असल्याने शेतात कधीही राखणीसाठी न जाता देवच त्यांच्या पिकाची राखण करत असल्याने पिकाची हानी न होणे !

पू. मामांच्या शेजारचे शेतकरी प्रत्येक वर्षी राखणीसाठी रात्रीचे शेतात जातात, तरीही त्यांचे भाताचे पीक रात्री प्राणी खातात. पू. मामा कधीच राखणीला जात नसूनही त्यांच्या शेतात रात्रीचे एकही जनावर येत नाही. तेव्हा लक्षात येते की, पू. मामांच्या शेताची राखण देवच करतो. त्यामुळे शेतातील पीक खायला जनावरे येत नाहीत.

अल्प भूमी असूनही साधनेमुळे अधिक पीक येणे !

पीक (भात) खळ्यावर (मैदानात) असते, तेव्हा पू. मामा त्याच्या भोवती नामजप करत मंडल काढतात. तेथे उदबत्ती दाखवतात, तसेच पिकाला लक्ष्मी मानून ते तिची आदरपूर्वक सेवा करतात. घरी नेण्यासाठी पीक गोणीत भरतांना ‘मी धनलक्ष्मीला माझ्या घरी घेऊन जात आहे’, या भावाने ते धान्य भरण्याची सेवा करतात. त्यामुळे त्यांच्या पिकात वाढ होते. पू. मामांची भूमी अल्प आहे; पण त्या भूमीत अधिक पीक येते. तेव्हा हे सगळे पू. मामा साधनेमुळे साध्य करतात, असे जाणवते.’ या सगळ्यातून एक शिकायला मिळाले की, कृती करतांना देवाचे साहाय्य घेतले की, देवच सारे करतो.’

– एक साधिका (२५.४.२०१५)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक