स्वधर्म, स्वदेश आणि  स्वकुल यासंबंधी अभिमान बाळगणारे महाराणा प्रतापसिंह !

आज २ जून २०२२ या दिवशी महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…

अतुल पराक्रम, आत्यंतिक स्वार्थत्याग, मूर्तीमंत देशाभिमान आणि धर्माभिमान इत्यादी गुणांमुळे महाराणा प्रतापसिंह यांचे नाव अजरामर झाले आहे. प्रतापसिंह गादीवर आल्यापासूनच चितोडचे पूर्वीचे वैभव आणि सामर्थ्य परत आणण्याच्या सिद्धतेस राणा प्रताप यांनी प्रयत्न चालू केले. परिस्थिती प्रतिकूल होती. बहुतेक राजपूतांनी परकियांना स्वतःच्या मुली देऊन सोयरिक केली होती. प्रतापी राजाला हे सहन झाले नाही. मागील राजे कमकुवत निघाले, तेवढ्या अवधीत अकबर बादशाहाने सारी राजपूत राज्ये आपल्या कह्यात आणण्याचा सपाटा चालवला होता. चितोड परत घेणे, हे महाराणा प्रतापांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांना कित्येक दिवसांपर्यंत रानावनांतून हिंडावे लागले, कंदमुळांवर निर्वाह करावा लागला. त्याची धडाडी पाहून अकबर म्हणे, ‘‘मला शरण ये, मी तुला तुझे राज्य देतो.’’ त्यावर राणा प्रताप सांगे, ‘‘मी राज्यप्राप्तीसाठी शत्रूला शरण जाऊन अभिमानशाली राजपूत कुल कलंकित करणार नाही.’’ ‘चितोड परत घेईपर्यंत सोन्याचांदीच्या ताटांऐवजी पानापत्रावळीवर भोजन करायचे आणि बिछान्यावर न झोपता गवताच्या शय्येवर झोपायचे’, अशी महाराणा प्रताप यांची प्रतिज्ञा होती.

महाराणा खरे योद्धे होते. त्यांच्या शौर्याची वाहवा प्रत्यक्ष शत्रूही करत. ‘‘त्यांचा स्वधर्म, स्वदेश आणि स्वकुल यासंबंधीचा अभिमान तर सूर्याइतका तेजस्वी अन् प्रखर होता. अकबरांशी युद्ध करण्यात दाखवलेले शौर्य अलौकिक होते. त्यांनी अनेक वेळा युद्धप्रसंगी सापडलेल्या बेगमांना सन्मानपूर्वक वागवले. त्याच्या मरणानंतर शत्रूंनीही आसवे (अश्रू) गाळली.’’

(साभार : ‘दिनविशेष’)