१. पावसाळा जवळ आल्याचे संकेत देणारे चातक पक्षी
पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल, तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले, तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की, पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले, हे हमखास समजावे.
२. सृष्टीतील पालटांचे पूर्वसंकेत देणारा पावशा पक्षी
चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील पालटांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत ! ‘पेरते व्हा’, असे सांगणारा पावशा ओरडू लागला की, जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे चालू करत.
३. ‘कोड्यान केको’ सांकेतिक स्वरात पावसाचे लक्षण दर्शवणारे तित्तीर पक्षी
माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोड्यान केको.. कोड्यान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की, आता लवकरच पाऊस येणार, असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही; परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा चालू झाला की, ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.
४. घरट्याच्या माध्यमातून पावसाचे डोळस संकेत देणारा कावळा
कावळ्याने मे मासाच्या काळात बाभूळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले, तर पाऊस न्यून पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले, तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातील अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले, तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले, तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले, तर पाऊस अत्यंत अल्प पडणार आणि झाडाच्या शिखरावर केले, तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करत नाही आणि केले, तर ती अत्यंत दुर्मिळ घटना असते.
४ अ. कावळिणीने किती अंडी घातली, यावरून अंदाज बांधता येणे : यापेक्षाही मनोरंजक म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने अनुमाने ४ अंडी दिली, तर पाऊस चांगला पडतो. जर २ अंडी दिली, तर न्यून पाऊस आणि एकच अंडे दिले, तर अतिशय अल्प पाऊस पडतो. जर तिने जमिनीवर अंडी दिली, तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.
५. कोळ्यांना वादळवाऱ्याचा संकेत देणारा वादळी पक्षी
पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार, याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मासेमार त्यांच्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशा वेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्या पाठोपाठ येत आहे, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.
६. पाऊस केव्हा पडणार आणि संपणार, याची सुस्पष्ट चाहूल देणारे पहाडी अन् डोंगरी भागातील मासे
पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंड्यांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा आणि उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.
७. समुद्राच्या दिशेने सहस्रोंच्या संख्येने जाऊन पावसाचे संकेत देणारे खेकडे
तांबूस रंगाचे खेकडे सहस्रोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जातांना दिसतात. अशा वेळी जर आपण त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे सहस्रो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासाच्या वेळी चिरडले जातात; परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कुणीही विचार करत नाही.
८. हरिणी
पाऊस येणार नसेल, तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.
९. वाघीण
आम्ही पाहिलेली वाघीण ही गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती; परंतु या वाघिणीने ‘डायसकोरिया’चे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी महिलाही गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत रहाणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीही रहाणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल, याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.
१०. वाळवी
जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत; परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे सहस्रोंच्या संख्येने एका झपाट्यात बाहेर पडू लागले की, पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढ्या तयार होतात. त्या जंगलात वारुळे सिद्ध करतात.
११. काळ्या मुंग्यांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज बांधणे
सहस्रोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.
१२. बिळांमधून बाहेर पडून पाऊस येण्याआधी उंच जागा शोधणारे सरपटणारे जीव
बिळांमध्ये दडून रहाणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की, ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. ते स्वत:च्या बचावासाठी उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापही मोठ्या प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.
१३. वृक्षांच्या माध्यमातून पावसाविषयी मिळणारे संकेत
अ. मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणारा गोडंबा, म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे, हे दुष्काळाचे संकेत आहेत.
आ. खैर आणि शमी यांच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस न्यून पडतो.
इ. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.
ई. बिचुलचा आणि कुटजाचा बहर तर अतीवृष्टीचेच हाकारे देतो.
उ. आपण वेली पहातो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे रहातांना दिसू लागले, तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.
लेखक – मारुति चितम्पल्ली (साभार : सामाजिक संकेतस्थळ)