संभाजीनगर महापालिका गरीब विद्यार्थ्यांसाठी चालू करणार ‘सी.बी.एस्.ई.’ शाळा !

संभाजीनगर – शहरातील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने पुढाकार घेत ‘सी.बी.एस्.ई.’चा (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा) अभ्यासक्रम असलेल्या शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये ३ शाळा चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी २७ मे या दिवशी दिली.

संजीव सोनार पुढे म्हणाले, ‘‘सिडको येथील एन् १२, इंदिरानगर येथील प्रियदर्शनी शाळा, शहागंज येथील चेलीपुरा हायस्कूल येथे ज्युनियर केजी आणि सिनियर केजी वर्ग चालू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि इमारती आहेत तेथे ‘सी.बी.एस्.ई’चा अभ्यासक्रम चालू करण्यात येत आहे. सध्या आहे त्या शिक्षकांवर अभ्यासक्रमाचे दायित्व देण्यात आले असून नंतर शिक्षकांची भरती करण्याचा मानस आहे.’’