‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘भारतीय साधक समाज’ यांच्या संयुक्त विद्यमाने हावडा येथे ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !
हावडा (बंगाल) – धर्मकार्य करतांना आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणि मुखावर आनंद ठेवला पाहिजे. आपण आपल्या घरी लहान लहान कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करत रहावे. कोणतेही निमित्त असले, तरी राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी लोकांना सतत जागृत केले पाहिजे. आपण आपल्या कोणत्याही कार्यात आध्यात्मिकता ठेवावी. त्यामुळे आपल्याला निश्चित यश मिळेल, असे मार्गदर्शन येथील ‘रिसडा प्रेम मंदिर आश्रमा’चे स्वामी निर्गुणानंद महाराज यांनी केले. हावडा येथे ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘भारतीय साधक समाज’ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ मे या दिवशी ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या अधिवेशनामध्ये हावडा आणि हुगळी जिल्ह्यांतील १७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या अनेक हिंदुत्वनिष्ठांनी सहभाग घेतला.
या वेळी ‘भारतीय साधक समाजा’चे संस्थापक श्री. अनिर्बान नियोगी यांनी ‘हिंदूसंघटन वाढवण्याची आवश्यकता आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न’, यांविषयी, तर समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी ‘हलाल जिहाद’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समितीचे श्री. सुमंत देबनाथ यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सामाजिक माध्यमांचा उपयोग कसा करायचा ?’, याविषयी माहिती दिली.
‘हलाल जिहाद’कडे सरकारचे दुर्लक्ष ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सध्या हिंदूंसमोर अनेक समस्या आहेत. एका माहितीनुसार भारतात १८ हून अधिक जिहाद चालू आहेत. यातील ‘हलाल जिहाद’चे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. हलालच्या नावावर बहुसंख्य हिंदूंना अल्पसंख्यांकांच्या मागणीला बळी पडावे लागत आहे. सर्वाधिक दु:खाची गोष्ट, म्हणजे याविषयी सरकार कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. याविषयी हिंदू अनभिज्ञ असल्याने हलाल अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिक सबळ होत आहे.
अधिवेशनात सहभागी संघटना
भारतीय साधक समाज, सनातन धर्म संस्कृती आणि अध्यात्म चर्चा केंद्र, शास्त्र धर्म प्रचार सभा, रा.स्व. संघ, हिंदु जागरण मंच, गेरुवा बंधू, अखिल भारत विवेकानंद युवा महासंघ, अंजनी पुत्र, राष्ट्रीय सनातनी परिवार, रिसडा प्रेम मंदिर आश्रम, वैदिक आणि ब्राह्म समाज, ‘इंटेलेक्ट’, महाभारत संघ, हिंदु जनजागृती समिती.
क्षणचित्रे :
१. या वेळी सर्व हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु जागृती आणि हिंदूसंघटन यांविषयी यापुढे सर्वांनी आपापसांत समन्वय ठेवण्याचा निश्चय केला.
२. या अधिवेशनासाठी सर्वश्री सुभाष गुवा, तपन घोष, बिस्वरंजन चटोपाध्याय यांनी विशेष योगदान दिले.