महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. ते रात्री ८ वाजता पुस्तक खरेदीसाठी एका दुकानात जात असतांना प्रसिद्धीमाध्यमांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. या वेळी वृत्तप्रतिनिधींना पाहून ‘जगू द्याल कि नाही ?’, असे म्हणत त्यांनी ध्वनीचित्रक (कॅमेरा) बंद करायला लावले. यानंतरही काही छायाचित्रकारांनी छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तात्काळ प्रसिद्धीमाध्यमांना ‘कॅमेरा’समवेत असणारे ‘लाईट’ही बंद करण्याच्या सूचना देऊन त्यांना तिथेच खडसावले. वास्तविक राज ठाकरे लोकप्रतिनिधी असल्याने ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. असे असतांनाही त्यांचे ‘जगू द्याल कि नाही ?’, हे वाक्य प्रसिद्धीमाध्यमांप्रतीची त्यांची उद्विग्नता दर्शवते. या प्रसंगातून ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी किंवा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे लागलेल्या माध्यमांना कशाचेही भान राहिले नाही, हेच दिसून येते. राज ठाकरे यांना कठोर शब्दांत पत्रकारांच्या अयोग्य कृतींची जाणीव करून द्यावी लागली, याचे चिंतन माध्यमांनी करणे अत्यावश्यक आहे.
सध्या राज ठाकरे भोंग्याच्या विषयावरून माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. याचा अर्थ नेहमीच त्यांच्या मागे बातमीसाठी धावायला हवे, असे नाही. राज ठाकरे एका दुकानात पुस्तक खरेदीसाठी गेले असतांना तेथे बातमीमूल्य काय असणार ? हेही प्रसिद्धीमाध्यमांना कळू नये, याचे आश्चर्य वाटते. जगातील अन्य घडामोडी आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांचे विषय संपल्याप्रमाणे पत्रकार केवळ राज ठाकरे यांच्या मागे धावले, असेच म्हणावे लागेल. अशा टोकाच्या पत्रकारितेमुळेच लोकांचा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील विश्वास दिवसेंदिवस अल्प होत आहे. कोणतीही भीड न बाळगता राज ठाकरे यांनी पत्रकारांना त्यांच्या अयोग्य कृतींची जाणीव करून देत खडसावले आणि ध्वनीचित्रक बंद करायला लावले, यातून अन्य लोकप्रतिनिधी काही बोध घेतील का ?
लोकशाहीच्या दृष्टीने विचार केल्यास माध्यमांना बातमीमूल्य कळत नाही; म्हणून खडसवावे लागणे, हे लज्जास्पद आहे. या प्रसंगातून माध्यमांनी अंतर्मुख होऊन समाजाला दिशा देणारी आदर्श पत्रकारिता अंगी बाणवायला हवी आणि ती हिंदु राष्ट्रात असेल, हे नक्की !