भक्तांचा उद्धार आणि धर्मसंस्थापना यांसाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती करणारे अन् भगवंताचे सगुण रूप असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

ईश्वराच्या ईश्वरत्वाचा आणि अन्य सर्वच दैवी गुणांचा उगम त्याच्या ‘निरपेक्ष प्रीती’ या गुणातून होत असतो. तेच या सृष्टीचे, म्हणजे आपल्या जन्माचे कारण असून आनंदप्राप्तीचे कार्यही तेच आहे. भगवंताने पृथ्वीवर १० अवतार घेण्याचे कारणही तेच असून भक्तांवरील प्रीतीमुळेच ईश्वर धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. ईश्वराची प्रीती हीच धारणाशक्ती असून तोच त्याचा धर्म आहे. ईश्वराच्या प्रीती या अनन्यसाधारण गुणांमुळेच सर्व जिवांना त्याची ओढ लागते. त्याच्या प्रीतीविना सूर्य, चंद्र आणि तारांगणे एका क्षणात निष्प्रभ होतील अन् आपले सर्वांचे जीवन कवडीमोल होईल. अशा ईश्वराचे, त्या ब्रह्मांडनायकाचे सगुण रूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक प्रेम हेच आम्हा साधकजिवांचे इहलोकीचे आणि परलोकीचे वैभव आहे.

त्या ब्रह्मांडनायकाचे अवतार कार्य साऱ्या ब्रह्मांडात, प्रत्येक कणाकणांत सूक्ष्मातून चालू असते. ते कार्य विराट, अनंत आणि अथांग असून ते कळणेही जिथे अशक्य आहे, तिथे त्याचे वर्णन कोण आणि कसे करू शकणार ? थेंबाने सागराचे वर्णन कसे करावे ? इवलीशी ज्योत तेजाची आरती कशी करणार ? तरीही आपण रथसप्तमीला निरांजनाने सूर्यनारायणाला ओवाळतोच ना ? तोच कृतज्ञताभाव ठेवून हे कृतज्ञतापुष्प भगवंताच्या सगुण रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. पृथ्वी, सप्तलोक आणि सप्तपाताळ

१ अ. सप्तलोक आणि सप्तपाताळ अन् त्यात वास करू शकणारे जीव : या ब्रह्मांडातील सप्तलोक (भू (पृथ्वी), भुवर्, स्वर्ग, महर्, जन, तप, सत्य हे सप्तलोक) आणि सप्तपाताळ (अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ) यांमध्ये पृथ्वीचे (भूलोक) स्थान मध्यभागी आहे. सप्तलोकांतील उर्वरित ६ लोक हे पृथ्वीच्या वरती (ऊर्ध्व) दिशेला असून या लोकांत ईश्वराचे भक्त आणि सात्त्विक अन् अत्यल्प अहं असलेले पुण्यात्मे वास करतात. पृथ्वीच्या खालच्या (अधः) भागात असून तेथे पापी जीव, ईश्वराची विरोधीभक्ती करणारे अहंकारी अन् तमोगुणी जीव, म्हणजे पापात्मे वास करतात.

१ आ. मानवावर धर्म आणि अधर्म यांचा सारखाच प्रभाव पडत असणे : पृथ्वीवर जन्मलेल्या मानवप्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मानवावर सतत धर्म आणि अधर्म या दोन्ही गोष्टींचा सारखाच प्रभाव पडत असतो. तो स्वतःच्या क्रियमाणाने देवही बनू शकतो आणि दैत्यही बनू शकतो.

१ अ १. मानवाने धर्माचरण करून साधना केल्यास तो नराचा नारायण होऊ शकणे : माणसाने योग्य प्रयत्न आणि योग्य साधना केल्यास तो ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो. मानवामध्ये देव, धर्म, ज्ञान आणि साधना या गोष्टी कळण्याची अन् साधना करण्याची क्षमता आहे. त्याने योग्य क्रियमाण वापरून साधना केल्यास तो नराचा नारायण होऊ शकतो.

१ आ २. मानव आपल्या अयोग्य कृतींमुळे असुर बनणे : पापात्मे पृथ्वी (भूलोक) आपल्या कह्यात घेण्यासाठी पृथ्वीवरील मानवांसह सर्व जिवांवर आक्रमणे करत असतात. त्यामुळे साधना न केल्यास जीवात्म्यावरील अज्ञानाचे काळे आवरण वाढत जाऊन तो तमोगुणी बनतो. त्यामुळे अहंकार, संकुचित वृत्ती, भोगवासना आणि विकार बळावून तो पशूप्रमाणे वागतो. अशा वेळी पाताळातील अनिष्ट शक्ती माणसातील स्वभावदोष अन् अहं यांचा लाभ उठवतात अन् माणसाच्या मनात अधर्माची (षड्रिपूंची) स्थापना करतात.

२. धर्मसंस्थापना आणि भक्तांचा उद्धार हे श्रीविष्णूच्या अवतार धारणेचे कारण असणे

सौ. शालिनी मराठे

२ अ. साधना करणाऱ्या भक्तांचे रक्षण करणे : पापात्म्यांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी ईश्वर सगुण रूपात पृथ्वीवर अवतरतो. धर्म-अधर्म यांच्यातील हा लढा नेहमी पृथ्वी आणि मानवी देह या स्तराला लढला जातो. त्यामुळे अधर्माचा नाश करून धर्म आणि ईश्वराचे भक्त यांचे रक्षण करण्यासाठी ईश्वराला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतो.

२ आ. भक्ताला साधना शिकवून त्याला ईश्वरप्राप्ती करून देण्यासाठी धर्मसंस्थापना करणे : ‘ईश्वरप्राप्ती’ हे मनुष्यजन्माचे ध्येय असून ‘माणसाचा आत्मा हा ईश्वराचा अंश आहे’, याची अनुभूती (आत्मानुभूती) देण्यासाठी, काळानुसार योग्य साधनामार्ग निर्माण करण्यासाठी, ईश्वराशी अनुसंधान ठेवून सात्त्विकता वृद्धींगत कशी करायची ? शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती हे साधनेतील टप्प्पे कसे अनुभवायचे ?’, हे शिकवण्यासाठी, म्हणजेच धर्मसंस्थापनेसाठी ईश्वर देह धारण करून सगुण रूपात पृथ्वीवर येतो.

३. कलियुगातील समाजाची दुःस्थिती !

३ अ. मानवाच्या आत्मचैतन्यावरील तमोगुणाच्या आधिक्यामुळे साधनेचे मार्ग अवरुद्ध (बंद) होणे : कलियुगात साधनेअभावी अधर्माला प्रगती समजण्याएवढी माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली असून त्यामुळे माणसांचे षड्विकार उफाळून आले आहेत. त्यामुळे तमोगुणाच्या (मायेच्या) चिखलांत तो पूर्णपणे रुतला आहे. ‘कोरोना महामारी’च्या काळात दळणवळण बंदीमुळे सर्व वाहनांचे मार्ग बंद झाले, त्याप्रमाणे कलियुगातील मानवाच्या आत्मचैतन्यावर तमोगुणाचे (अज्ञानाचे) आवरण येऊन साधनेचे सर्व मार्ग अवरुद्ध (बंद) झाले आहेत.

३ आ. कलियुगात सर्व मानवजीव साधनेच्या एका टप्प्यावर अडकून पडणे : कलियुगात सर्वसाधारण माणसाची आध्यात्मिक पातळी २० टक्के असल्यामुळे कोणत्याही साधनामार्गाने पुढे जाणे त्याला कठीण झाले. पृथ्वीवरील सर्व मानवजीव एकाच टप्प्याला अडकले आहेत. काही संप्रदायात, काही पंथात, काही वर्णाश्रमात, काही देवतांच्या अनेक रूपांत, काही त्यांच्या श्री गुरूंच्या स्थूलरूपात, तर काही जण एकांगी साधनेत, म्हणजे ईश्वराच्या तारक किंवा मारक अशा एकाच रूपात अडकले. त्यामुळे संकुचितपणा, अहंकार आणि चढाओढ यांमुळे पृथ्वीवरील सर्व मानवजीव साधनेच्या कोणत्या तरी एका टप्प्याला अडकून पडले आहेत.

(क्रमशः)

– गुरुचरणी शरणागत, सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२१)


‘साधकांची साधना व्हावी’, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेली अपार कृपा, म्हणजे त्यांनी स्थापन केलेली सनातन संस्था आणि सनातचे आश्रम !

सनातन धर्म आणि ईश्वर एकच आहेत. साधना ही पूर्णवेळ आणि सातत्याने करायची असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळून व्यक्ती आणि समाज यांची सात्त्विकता वाढायला हवी. सात्त्विकतेमुळेच धारणा शक्ती येते. सात्त्विकतेमध्येच ‘आत्मबळ’, ‘आत्मज्ञान’ आणि ‘आत्मानंद’ आहे. ब्राह्मतेजही सात्त्विकच आहे. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी अखिल मानवजातीला मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली.

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. सनातन संस्था

सनातन संस्थेचे संस्थापक, पालक आणि चालकही श्रीमन्नारायणच (परात्पर गुरु डॉ. आठवले हेच) असून त्यांनी साधकांच्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकृपायोगाची निर्मिती केली. गुरुकृपायोगानुसार साधना करून १.५.२०२२ पर्यंत १२१ साधक संतपदापर्यंत पोचले आहेत अन् १,३६४ साधक जन्म-मृत्यूचा फेरा चुकवून मोक्षाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

२. सनातनचे आश्रम

सनातनचे आश्रम ही सनातन धर्माची परिपूर्ण, सर्वांग सुंदर आणि आदर्श अशी गुरुकुलेच आहेत. येथे धर्मशिक्षण, धर्माचरण आणि धर्मनिष्ठा यांचे संवर्धन झाल्यामुळे येथे घडलेला साधक, हा जगात कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकतो अन् साधना चालू ठेवू शकतो. घरी ३ वर्षांत होऊ न शकणारी साधना येथे आश्रमात केवळ ३ मासांत होते. इथे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने हे फार सुलभ होते. त्यासाठी प्रत्येकाने येथे येऊन स्वतः घडावे आणि मग समष्टीला घडवावे. ‘साधकांनी केवळ साधना करावी’, यासाठी आश्रमात भगवंतच (परात्पर गुरु डॉ. आठवले हे) साधकांचा योगक्षेम वहातो. त्यामुळे साधक येथे तणावमुक्त होऊन आनंद अनुभवतात. आता गुरुकृपेने प्रत्येक साधकाचे घर हा सनातनचा छोटासा आश्रमच झाला आहे.

– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.