‘बुद्धी ही सृष्टीतील एक अनमोल गोष्ट आहे. बुद्धीच्या विकासावर ज्ञानाचे प्रकटीकरण अवलंबून असते. बुद्धी एकाच प्रकारची नसून तिचे विविध स्तर आहेत. त्या प्रत्येक स्तराची वैशिष्ट्ये आणि कार्ये वेगवेगळी आहेत. बुद्धीचे विविध स्तर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग, यांचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे. लेखात वर्णन केलेले बुद्धीचे विविध स्तर हे महर्षि अरविंद घोष यांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. २६ जुलैच्या प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘बुद्धी म्हणजे काय ?, बुद्धीचे विविध स्तर आणि ग्रहयोग यांचा संबंध’ यांविषयी वाचले. त्यात ‘जडबुद्धी, आवेगशील बुद्धी, तर्कबुद्धी आणि उच्चबुद्धी’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग २)
लेखाचा मागील भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1065075.html

२. बुद्धीचे विविध स्तर आणि ग्रहयोग यांचा संबंध
२ उ. प्रकाशशील बुद्धी (Illumined mind) : ‘विचार’ हे ज्ञानाचे देवाण-घेवाण करण्यासाठीचे उपयुक्त साधन आहेत; मात्र विचारांद्वारे सत्याचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही; कारण सत्य हे विचारस्वरूप नाही, तर प्रकाशस्वरूप आहे. सत्याचे ज्ञान हे विचारांद्वारे नाही, तर दर्शनाद्वारे प्राप्त होते. तर्कबुद्धी आणि उच्चबुद्धी हे स्तर विचारांच्या कक्षेत येतात, तर प्रकाशशील बुद्धी ही प्रकाशाच्या कक्षेत पाऊल टाकणारी पहिली पायरी आहे. प्रकाशशील बुद्धीमध्ये सत्याचे वैचारिक चिंतन नसते, तर सत्याचे दर्शन (vision) होते. ज्याप्रमाणे काळोख्या रात्री विजा चमकतात, त्याप्रमाणे प्रकाशशील बुद्धीमध्ये सत्याचे उत्स्फूर्त दर्शन होते. अर्थात् हे दर्शन सतत होत नसून क्षणिक असते; परंतु हे क्षणिक दर्शनही ज्ञानाचे दालन उघडते. संत, सिद्ध, उपासक आदींमध्ये प्रकाशशील बुद्धी प्रधान असते.
२ ऊ. अंतर्ज्ञान बुद्धी (Intuitive mind) : अंतर्ज्ञान बुद्धी ही श्रेष्ठ प्रकारची प्रकाशशील बुद्धी आहे. येथे सत्याचे थेट दर्शन अधिक प्रमाणात होते. अंतर्ज्ञान बुद्धीद्वारे त्रिगुण (सत्त्व, रज आणि तम), आध्यात्मिक स्पंदने (शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती), जिवाचे सूक्ष्म ऊर्जाक्षेत्र, आध्यात्मिक पातळी, सूक्ष्मातील चांगल्या आणि अनिष्ट शक्ती इत्यादींचे ज्ञान होऊ शकते. एखाद्या घटनेमागील कार्यकारणभाव बर्याच प्रमाणात कळू शकतो. अंतर्ज्ञान बुद्धी ही सूक्ष्म-जगताचे ज्ञान करून देणारे महत्त्वाचे माध्यम आहे. उच्च पातळीचे संत, सद्गुरु, तपस्वी, योगी आदींमध्ये अंतर्ज्ञान बुद्धी प्रधान असते.

२ ऊ १. प्रकाशशील बुद्धी आणि अंतर्ज्ञान बुद्धी यांच्याशी संबंधित ग्रहयोग : ग्रहांमध्ये ‘गुरु’, ‘हर्षल’ आणि ‘नेपच्यून’ हे ग्रह प्रामुख्याने सूक्ष्म ज्ञानाशी संबंधित आहेत. त्यांचे अन्य ग्रहांशी होणारे योग अंतर्ज्ञान दर्शवतात.
२ ऊ १ अ. ‘रवि’, ‘बुध’, ‘गुरु’, ‘हर्षल’ आणि ‘नेपच्यून’ यांच्यातील परस्परयोग : हा ग्रहयोग अंतर्ज्ञान दर्शवतो. हा योग असणार्या व्यक्तीला ज्ञान दर्शनाने (vision) होऊन ती ते संकल्पना, सिद्धांत, लिखाण आदींच्या रूपात मांडते.
२ ऊ १ आ. ‘चंद्र’, ‘शुक्र’, ‘गुरु’, ‘हर्षल’ आणि ‘नेपच्यून’ यांच्यातील परस्परयोग : हा ग्रहयोग अंतःप्रेरणा दर्शवतो. हा ग्रहयोग असणार्या व्यक्तीला ज्ञान जाणिवेच्या रूपात होते. अशी व्यक्ती ते ज्ञान संवाद, प्रेम, कला, काव्य, भक्ती आदींच्या रूपाने व्यक्त करते.
येथपर्यंत वर्णन केलेले बुद्धीचे स्तर हे व्यष्टी (व्यक्तीगत) स्तरावरील होते. पुढे दिलेले बुद्धीचे २ स्तर हे समष्टी (वैश्विक) स्तरावरील आहेत.
२ ए. विश्वबुद्धी (Overmind) : हिला ‘देवतांची बुद्धी’ असेही म्हणतात. ती वैश्विक तत्त्वे, नियम, शक्ती आदींच्या रूपात व्यक्त होते; परिणामी ती जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे कार्य करते. ती सत्य ज्ञानावर अधिष्ठित असते; पण व्यक्त होण्यासाठी द्वैतरूप घेते. तिच्यात सत्याचे वेगवेगळे पैलू स्वतंत्रपणे कार्य करतात. हिंदु धर्मात वर्णन केलेल्या विविध देवता ही दैवी बुद्धीची विविध रूपे आहेत.
दैवी बुद्धी जागृत असलेल्या व्यक्ती या त्रिकालदर्शी असतात. त्यांना जिवाच्या पूर्वजन्मांतील घटना, भविष्यातील घटना, मृत्यूनंतर जीवात्म्याचा होणारा प्रवास, सप्तलोक आणि सप्तपाताळ यांत होणार्या घडामोडी, घटनेमागील कार्यकारणभाव आदींचे स्पष्ट ज्ञान होते. परात्पर गुरु, ऋषि, महर्षि आदींमध्ये ही बुद्धी जागृत असते.
२ ऐ. ईश्वरी बुद्धी (Supermind) : बुद्धीचा अत्युच्च स्तर म्हणजे ईश्वराची अनंतबुद्धी. ईश्वरी बुद्धी ही सत्यात अखंड स्थिर असते. तिच्यात अज्ञानाचा लवलेशही नसतो. ती सर्वज्ञानी, सर्वव्यापक आणि सर्वशक्तीमान आहे. ती जगाचे मूळ कारण आहे. ती पुरुष आणि प्रकृती, स्थूल अन् सूक्ष्म, सगुण आणि निर्गुण, व्यष्टी अन् समष्टी, एक आणि अनेक असे सर्वकाही आहे, अर्थात् ती अद्वैतबुद्धी आहे.
ही बुद्धी जागृत असलेली व्यक्ती (विभूती) ईश्वराशी एकरूप झालेली असते. ती सदैव ‘सोहम्’ भावात (अद्वैत भावात) स्थिर असते. प्रत्यक्ष ईश्वरच तिच्या माध्यमातून कार्य करत असतो. अशी व्यक्ती ही ‘समाजात धर्मसंस्थापना करणे आणि मानवजातीची आध्यात्मिक उन्नती करवून घेणे’, यांसाठी कार्यरत असते. अवतारी विभूतींमध्ये ईश्वरी बुद्धी कार्यरत असते. (टीप : विश्वबुद्धी आणि ईश्वरी बुद्धी हे स्तर ग्रहांच्या पलीकडे आहेत. त्यामुळे या स्तरांचे ग्रहयोगांच्या अनुषंगाने विवेचन केलेले नाही.)
३. बुद्धीच्या विविध स्तरांचा बोध होण्यासाठी कुंडलीतील सर्व ग्रहयोगांचा विचार करणे आवश्यक
मनुष्यामध्ये जडबुद्धीपासून अंतर्ज्ञान बुद्धीपर्यंतचे सर्व स्तर कार्यरत असतात; पण त्यांचे प्रमाण प्रत्येकामध्ये निरनिराळे असते, उदा. काहींची आवेगशील बुद्धी, तर काहींची तर्कबुद्धी अधिक कार्यरत असते. त्यामुळे मनुष्यातील बुद्धीच्या या विविध स्तरांचा बोध होण्यासाठी कुंडलीतील एखाद-दुसरा ग्रहयोग विचारात न घेता सर्व ग्रहयोग विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच ते ग्रहयोग कोणत्या राशींमध्ये आणि कोणत्या स्थानांमध्ये आहेत, हेही पहाणे आवश्यक आहे. यावरून त्यांचा प्रभाव लक्षात येतो.
४. उदाहरणे

४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : यांच्या कुंडलीत ‘बुध’, ‘शनि’ आणि ‘हर्षल’ यांची युती आहे, तसेच त्या ग्रहांचा ‘चंद्र’, ‘शुक्र’ आणि ‘नेपच्यून’ या ग्रहांशी शुभयोग आहे. हे योग संशोधकवृत्ती, प्रयोगशीलता, नाविन्यता, अंतःस्फूर्ती, सूक्ष्म स्पंदने जाणण्याची आणि सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्याची क्षमता दर्शवतात. हे योग तर्कबुद्धी आणि अंतर्ज्ञान बुद्धी यांचे दर्शक आहेत.

४ आ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे : यांच्या कुंडलीत ‘रवि’, ‘चंद्र’ आणि ‘गुरु’ यांची युती आहे, तसेच त्यांचा ‘शनि’ ग्रहाशी शुभयोग आहे. हे योग सत्त्वप्रधान वृत्ती, धर्मपरायणता, विवेक, ज्ञानप्राप्तीची तळमळ आणि व्यापकता दर्शवतात. हे योग उच्च बुद्धी आणि प्रकाशशील बुद्धी यांचे दर्शक आहेत.

४ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : यांच्या कुंडलीत ‘रवि’, ‘शुक्र’, ‘चंद्र’, ‘बुध’ आणि ‘हर्षल’ या ग्रहांची युती आहे, तसेच त्यांचा ‘गुरु’ आणि ‘शनि’ या ग्रहांशी योग आहे. हे योग संशोधकवृत्ती, ज्ञानप्राप्तीची तळमळ, तत्त्वनिष्ठा आणि सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्याची क्षमता दर्शवतात. हे योग तर्कबुद्धी आणि अंतर्ज्ञान बुद्धी यांचे दर्शक आहेत.

४ ई. पू. अनंत आठवले : यांच्या कुंडलीत ‘रवि’, ‘बुध’, ‘शुक्र’ आणि ‘नेपच्यून’ या ग्रहांची युती आहे. त्यांचा ‘गुरु’, ‘शनि’ आणि ‘हर्षल’ या ग्रहांशी योग (संबंध) आहे. हे योग सत्यनिष्ठा, ज्ञानप्राप्तीची तळमळ, अभ्यासूवृत्ती अन् गूढ अर्थ उकलण्याची क्षमता दर्शवतात. हे योग उच्चबुद्धी आणि अंतर्ज्ञान बुद्धी यांचे दर्शक आहेत.
टीप : वर केलेले विश्लेषण हे जन्मकुंडलीतील ग्रहयोगांच्या आधारे केले आहे. संबंधित संतांमध्ये जन्मतः बुद्धीचा कोणता स्तर प्रधान होता, हे ते दर्शवतात. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊन व्यक्ती बुद्धीच्या आणखी पुढच्या स्तरांवर पदार्पण करते.
५. बुद्धीच्या उन्नत स्तरांवर जाणे, ही मनुष्याच्या विकासाची दिशा असणे
जडबुद्धीकडून अंतर्ज्ञान बुद्धीकडे आणि त्यानंतर विश्वबुद्धीकडे प्रवास करणे, ही मनुष्याच्या विकासाची दिशा आहे. जडबुद्धीपासून विश्वबुद्धीपर्यंत असलेले बुद्धीचे विविध स्तर हे उत्तरोत्तर चैतन्यमय, ज्ञानमय, सूक्ष्म, व्यापक अन् पारदर्शक आहेत. मनुष्य जितका वरच्या स्तरावर जाईल, तितका तो अधिक स्वतंत्र होतो, म्हणजे तो चित्तातील आवेगांच्या अधीन न रहाता चैतन्याच्या प्रेरणेने कार्य करतो. त्याला सत्याचे ज्ञान होते. त्यामुळे त्याला आनंद आणि शांती प्राप्त होते.

६. साधनेमुळे व्यक्ती बुद्धीच्या उन्नत स्तरांवर पोचत असणे
प्रकाशशील बुद्धी, अंतर्ज्ञान बुद्धी, विश्वबुद्धी आदी बुद्धीचे उन्नत स्तर हे विचारांच्या पलीकडचे आहेत. तेथे निरीक्षण, मोजमाप, वर्गीकरण आदी तर्कबुद्धीच्या विवेचनात्मक (analytical) कार्यप्रणाली लागू होत नाही. उन्नत स्तरांवर सत्याचे थेट दर्शन होते. त्या स्तरांवर पोचणे, हे केवळ साधनेमुळे शक्य आहे. साधनेमुळे जिवाच्या चित्तातील इच्छा, कामना, भावना, संस्कार, स्वभावदोष इत्यादी न्यून होतात; म्हणजेच त्याचे चित्त शुद्ध (सात्त्विक) होते. चित्त शुद्ध झाल्यामुळे चित्तातील संस्कारांचा बुद्धीवरील रज-तमात्मक प्रभाव न्यून होतो अन् बुद्धी सूक्ष्म, पारदर्शक आणि व्यापक होते. अशा शुद्ध बुद्धीत आत्म्याचा स्वयंभू प्रकाश परावर्तित होऊन जिवाला सत्याचे दर्शन होते. वेदांची रचना करणार्या ऋषींना ‘मंत्रद्रष्टा’ म्हटले जाते; कारण त्यांना सत्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. उच्च पातळीचे संत, गुरु, योगी आदी बुद्धीच्या उन्नत स्तरांवर पोचलेले असतात. त्यामुळे त्यांचे वचन, लिखाण, कार्य आदी ईश्वरी प्रेरणेने होत असते.
७. बुद्धीच्या उन्नत स्तरांवर जाण्यासाठी प्रयत्न करणे, हे समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक !
बुद्धीचे विविध स्तर ही केवळ ज्ञान ग्रहण करण्याची साधने नाहीत, तर ती जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन निश्चित करतात. ती जीवनाची मूल्ये ठरवतात. कनिष्ठ स्तरावरील बुद्धी ही संकुचित दृष्टीकोन देते. तेव्हा स्वार्थ, भौतिक सुख, वर्चस्व, सत्ता, संघर्ष, प्रतिष्ठा इत्यादी कनिष्ठ मूल्यांना महत्त्व प्राप्त होते. ही मूल्ये समाजात विभाजन, भ्रष्टाचार, अनैतिकता, संघर्ष आदी निर्माण करून मनुष्याला विनाशाकडे नेतात. याउलट उन्नत स्तरावरील बुद्धी ही व्यापक दृष्टीकोन देते. तेव्हा सत्य, प्रेम, सद्भाव, न्याय, व्यापकता, आनंद, शांती इत्यादी उच्च मूल्यांना जीवनात स्थान मिळते. त्यामुळे समाजात एकता, नैतिकता आणि समृद्धी वाढून समाजाची उन्नती होते.
सध्या समाजात ‘आवेगशील बुद्धी’ आणि ‘तर्कबुद्धी’ हे स्तर अधिक प्रमाणात कार्यरत आहेत. आवेगशील बुद्धी ही स्वार्थकेंद्रित असल्याने कनिष्ठ स्तराची आहे. तर्कबुद्धी ही मध्यम स्तराची आहे. तिचे जसे लाभ आहेत, तशा तिच्या मर्यादाही आहेत. हे आपण २६ जुलैच्या दैनिकात वाचले. तर्कबुद्धी प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र वस्तू समजते. ती अस्तित्वाचे मूळ चित्र पहाण्यास असमर्थ आहे. त्यामुळे सध्याच्या काळात असलेल्या सामाजिक समस्या सुटण्यासाठी आणि मानवजातीचा पुढील विकास होण्यासाठी समाजाने तर्कबुद्धीच्या पुढील स्तरांवर मार्गक्रमण करणे आवश्यक ठरणार आहे.’ (समाप्त)
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्विवद्यालय, गोवा. (३०.४.२०२६)
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन!
गुरुस्तवन भावांजली
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !