पुरातत्व विभागाकडून ताजमहालमधील २२ कुलूपबंद खोल्यांची छायाचित्रे प्रसारित

आगरा – भारताच्या पुरातत्व विभागाने ताजमहालच्या २२ खोल्यांची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. ‘या २२ कुलूपबंद खोल्या उघडल्या जाव्यात’, अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुरातत्व विभागाने या खोल्यांची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. ताजमहालच्या खर्‍या इतिहासाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका भाजपचे अयोध्या येथील प्रसिद्धी प्रमुख रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठात प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर ही छायाचित्रे प्रसारित करण्यात आली.

‘ताजमहाल हे पूर्वीचे तेजोमहालय असून तेथे शिवमंदिर होते’, असे रजनीश सिंह यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आले होते. ‘हे सत्य समोर आणण्यासाठी सरकारने सत्यशोधक समिती स्थापित करावी’, अशी मागणीही यात करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी छायाचित्रे प्रसारित करत, ‘या खोल्यांमध्ये कोणतेही रहस्य नाही. त्या केवळ रचनेचा भाग आहेत. त्या अद्वितीय नाहीत. त्यात अनेक मोगलकालीन थडगी आहेत’, असे म्हटले आहे.