परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याने ते केवळ सनातनचे न रहाता त्रैलोक्याचे स्वामी असल्याची साधिकेला आलेली अनुभूती

२.५.२०२१ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ भावसोहळा झाला. ३.५.२०२१ या दिवशी मी चारचाकीतून कार्यालयात जातांना खिडकीतून बाहेर आकाशाकडे पहात होते. त्या वेळी मी भ्रमणभाषवर ‘माऊली, माऊली’ हे गाणे ऐकत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘जगातील समस्त लोक आणि वारकरी यांना परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचे अवतार आहेत’, हे समजले, तर काय होईल ?’ त्या वेळी माझ्या मनाची झालेली प्रक्रिया पुढे दिली आहे.

सौ. कविता बेलसरे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचे अवतार असल्याने ‘रामनाथी आश्रमासमोर वारकऱ्यांची गर्दी होईल’, असे वाटणे

त्यानंतर मला रामनाथी आश्रमासमोर दिंडी आणि वारकरी दिसू लागले. मला वाटले, ‘एकदा का सर्वांना कळले, तर प्रतिदिन इकडेही वारकरी पंढरपूरसारखीच गर्दी करतील. त्या वेळी इतकी गर्दी होईल की, प्रत्येक भक्त कळसाचे दर्शन घेऊनही समाधान पावेल आणि आनंदी होईल. हे स्थुलातून झाले; परंतु सूक्ष्मातून ‘अनेक वारकऱ्यांचे लिंगदेह दर्शन घेण्यासाठी येतच असतील’, असे मला जाणवले. त्या वेळी मला आतून वारकऱ्यांचा पांडुरंगाप्रती असणारा भाव जाणवत होता.

२. देव (परात्पर गुरु डॉ. आठवले) विश्वव्यापी असल्याने अंतरात भक्ती असलेल्या साधकांना त्यांचे केव्हाही दर्शन होईल !

तेव्हा माझ्या मनात स्वार्थी विचारही येऊन गेला की, ‘सर्वांना कळले की, परात्पर गुरु डॉक्टर विष्णूचे अवतार आहेत, तर आम्हा साधकांना त्यांचे दर्शन मिळणे किती अवघड होईल ?’ हा माझ्यातील संकुचित जिवाचा विचार होता. ‘देव अखिल ब्रह्मांड व्यापून उरला आहे आणि देव सर्वच भक्तांचा असतो. तो त्यांना कसेही दर्शन देणारच. केवळ अंतरात भक्ती हवी’, हे माझ्या लक्षात आले.

३. देवाचे अलौकिक दर्शन प्राप्त झाल्याने व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘परात्पर गुरु डॉक्टर हे त्रैलोक्याचे स्वामी असून ते सर्वच जिवांचे स्वामी, माऊली आहेत’, असे मला जाणवले. या जाणिवेने माझे मन आनंदून गेले. माझी पात्रता नसतांनाही मला अनेक वेळा त्या दिव्य परमात्म्याचे दर्शन त्याच्याच कृपेने झाले आहे. ते प्रसंग आठवून माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

‘हे गुरुदेवा, आपल्याच कृपेने आपले दर्शन झाले, तसेच हे आनंददायी क्षण मला अनुभवता आले, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. कविता बेलसरे, पुणे (२५.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक