आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही ! – भारताचे नेदरलँड्सला प्रत्युत्तर

नेदरलँड्सच्या राजदूतांनी भारताविषयी केलेल्या विधानाचे प्रकरण

डावीकडून टी.एस्. तिरुमूर्ती आणि कैरेल वान ओस्टरोम

नवी देहली – संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे राजदूत असलेले टी.एस्. तिरुमूर्ती यांनी ब्रिटनमध्ये कार्यरत असलेले नेदरलँड्सचे राजदूत कैरेल वान ओस्टरोम यांना रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात सुनावले. त्यांनी ट्वीट करून म्हटले, ‘भारताने काय करावे, याचा आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. आम्हाला ठाऊक आहे की, आम्हाला काय करायचे आहे ?’ ओस्टरोम यांनी, ‘युक्रेनच्या सूत्रावर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होणे आवश्यक होते’, असे ट्वीट केले होते. त्या पार्श्वभूमीवर तिरुमूर्ती यांनी वरील ट्वीट केले.

या वर्षीच्या आरंभी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, महासभा आणि मानवाधिकार परिषद यांमध्ये युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाचा निषेध करण्यासाठी आयोजित मतदान अन् ठरावाच्या मसुद्यांपासून भारताने स्वत:ला दूर ठेवले होते.