ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानामृतामुळे असंख्य जिज्ञासू साधनाभिमुख झाले असून, १ मे २०२२ पर्यंत सनातनचे १२१ साधक संत झाले असून, १ सहस्र ३६४ साधक संत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर ‘यशवंत’ आहेत !

५ मे २०२२ या दिवशी ‘ग्रंथांच्या लिखाणाची मांडणी आणि सात्त्विकतेच्या दृष्टीने विचार’ आणि ‘तात्त्विक विवेचनासह उदाहरणे आणि साधकांना आलेल्या अनुभूती’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहूया.

संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैदीप्यमान ग्रंथकार्य !

 

अवघ्या २७ वर्षांत, म्हणजे वर्ष १९९५ ते एप्रिल २०२२ पर्यंत विविध विषयांवर सनातनचे ३५४ ग्रंथ-लघुग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. यांतील काही ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या १७ भाषांत ८८ लाख ८४ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर अजूनही ५,००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित करता येतील, एवढे लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांनी संगणकात विषयांनुसार वर्गीकरण करून ठेवलेले आहे !

हिंदु धर्मात अनंत ग्रंथ असण्याचे कारण

‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे हिंदु धर्मात अनंत ग्रंथ आहेत ! हे लक्षात न घेता काही धर्मद्वेष्टे हिंदू आणि इतर धर्मीय म्हणतात, ‘हिंदु धर्मात बायबल, कुराण यांसारखा एकच ग्रंथ नाही !’ ते हे लक्षात घेत नाहीत की, बालवाडीला एकच पुस्तक असते, तर पदव्युत्तर शिक्षण घेतांना अनेक पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो ! यासाठी हिंदु धर्मात अनंत ग्रंथ आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्मातील जिज्ञासूंसाठी ज्ञानाचे एक आगळेवेगळे दालन निर्माण करणाऱ्या सनातनच्या ग्रंथांची अद्वितीय वैशिष्ट्ये !

११. लिखाण सात्त्विक आणि परिपूर्ण होण्याच्या संदर्भातील घटक आणि त्यांचे तुलनात्मक महत्त्व

(वर्ष २०१६)

१२. ग्रंथांची एकंदरीतच सात्त्विकता वाढण्याच्या दृष्टीने घेतलेली काळजी

पू. संदीप आळशी

१२ अ. ग्रंथाचा मथळा बनवतांना सात्त्विकतेचा विचार : ‘देवपूजेपूर्वीची तयारी’ या ग्रंथासाठीचा मथळा बनवतांना मी ‘देवपूजेची पूर्वतयारी’, ‘देवपूजेची तयारी’ आणि ‘देवपूजेपूर्वीची तयारी’ अशा तीन प्रकारे मथळे बनवले होते. कोणता मथळा अधिक योग्य, हे सांगतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून उत्तर काढले आणि सांगितले, ‘‘देवपूजेपूर्वीची तयारी’ या नावात २७ टक्के सात्त्विकता आहे, तर उर्वरित दोन नावांत २० टक्के सात्त्विकता आहे.’’ यास्तव ग्रंथासाठी ‘देवपूजेपूर्वीची तयारी’ हाच मथळा ठेवला.’ (वर्ष २०१७)

१२ आ. मुखपृष्ठावरील शब्दयोजनेतही सात्त्विकतेचा विचार : ‘पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता (शास्त्रासह)’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर चित्राला समर्पक अशा काव्यपंक्ती घेतल्या होत्या – ‘शास्त्र जाणूनी करूनी पूजा । वाढे भक्ती अन् श्रद्धेचा ठेवा ॥’ यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून उत्तर काढून सांगितले, ‘‘काव्यपंक्तीचा शेवट ‘आकारान्त’पेक्षा ‘इकारान्त’ अधिक चांगला वाटतो.’’ यामुळे नंतर वरील काव्यपंक्ती पुढीलप्रमाणे पालटून घेतल्या – ‘शास्त्र जाणूनी पूजा करूनी । वाढे भक्ती, आनंद मनी ॥’

१२ इ. मुखपृष्ठाची संकल्पना आणि रंगसंगती सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून ! : सनातनचे साधक-चित्रकार मुखपृष्ठाच्या संकल्पनेचे ३ – ४ नमुने परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवतात. परात्पर गुरु डॉक्टर ‘कोणत्या संकल्पनेतून विषय अधिक चांगल्या प्रकारे कळेल’, हे पहाण्याच्या जोडीलाच त्या संकल्पनांचा सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातूनही विचार करतात. थोडक्यात चित्राच्या निवडीपासूनच सात्त्विकतेचा विचार चालू होतो ! चित्रासाठी निवड करण्यात येणारे ‘मॉडेल’ही (साधकही) सात्त्विक आणि ईश्वराप्रती भाव असलेले असतात.

चित्र सिद्ध करतांना फिकट निळा, पिवळा, गुलाबी यांसारखे सात्त्विक रंगच प्रामुख्याने वापरायला हवेत, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा दृष्टीकोन आहे; म्हणून सनातनच्या ग्रंथांच्या मुखपृष्ठांवरील रंगसंगती साधारणतः अशीच आढळते.

एकदा ‘संत भक्तराज महाराज विरचित भजनामृत’ या विषयावरील ग्रंथ आणि उत्पादने यांचे विज्ञापन (जाहिरात) बनवतांना आम्ही त्यासाठी पार्श्वभूमीला निळा रंग घेतला होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी ते विज्ञापन पडताळतांना भजनांतून ज्ञानाची शिकवण अधिक असल्याने निळ्या रंगाच्या ठिकाणी पिवळा रंग वापरण्यास सांगितला; कारण निळा रंग भक्तीचे, तर पिवळा रंग ज्ञानाचे प्रतीक आहे. ग्रंथाच्या विषयाला सुसंगत ठरेल, असा सात्त्विक रंग वापरल्यामुळे मुखपृष्ठाची, पर्यायाने ग्रंथाची सात्त्विकता वाढायला
साहाय्य होते.

१२ ई. सात्त्विक अक्षरांच्या प्रकारांची (‘फॉन्ट’ची) निवड : सनातनचे ग्रंथ विविध भाषांमध्ये प्रसिद्ध होतात. प्रत्येक भाषेतील अक्षरांच्या प्रकारांचा (‘फॉन्ट’चा) परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म स्पंदनशास्त्राच्या अनुषंगाने अभ्यास करून सात्त्विकतेच्या दृष्टीने अक्षरांच्या प्रकारांची (‘फॉन्ट’ची) निवड केली आहे. अक्षरांचा प्रकार (फॉन्ट) सात्त्विक वापरल्यामुळे ग्रंथांचे चैतन्य वाढण्यास साहाय्य झाले आहे.

१२ उ. लिखाणाची सात्त्विक संरचना (फॉर्मेटींग) : प्रत्येक पृष्ठावर समासासाठी सोडलेले अंतर, दोन ओळींमध्ये सोडलेले अंतर, विशेष लिखाणाला घालायच्या ‘ॐ’च्या किंवा सात्त्विक वेलविणीच्या (नक्षीच्या) चौकटी (फ्रेम्स), दर्शकचिन्हे म्हणून काळ्या गोळ्याच्या जागी वापरलेले स्वस्तिक (शुभचिन्ह) यांसारख्या लहान लहान गोष्टींमधून सात्त्विकता जपण्याचा प्रयत्न केला आहे.

१३. वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले संशोधनात्मक प्रयोग

उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक हे संतांनी सांगितलेले ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु आधुनिक विज्ञानवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना मात्र ‘शब्द प्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली, तरच ती खरी वाटते. तसेच सध्याच्या काळात व्यक्तीच्या किंवा ऋषिमुनींच्या अनुभवसिद्ध शब्दांपेक्षा वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध झालेले ज्ञानच अनेकांना विश्वासार्ह वाटते. त्यामुळे सनातनच्या ग्रंथांत वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले संशोधनात्मक प्रयोग समाविष्ट केले जातात.

फळाचा रस आणि मद्य यांपैकी फळाचा रस सेवन करण्याने, तसेच पाश्चात्त्य अन् भारतीय शास्त्रीय संगीत यांपैकी भारतीय शास्त्रीय संगीत ऐकण्याने व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मक परिणाम अभ्यासणे; नामजप, मुद्रा आणि न्यास यांचा गर्भवती स्त्री आणि गर्भ यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील सकारात्मक परिणाम अभ्यासणे; देशी गायीपासून प्रक्षेपित होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अभ्यासणे, यांसारखे ५,००० हून अधिक संशोधनात्मक प्रयोग मार्च २०२२ पर्यंत करण्यात आले आहेत.

१४. सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे आणि चित्रे

१४ अ. सूक्ष्म म्हणजे काय ? : पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’.

१४ आ. सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे : एखादी वस्तू किंवा घटना यांच्याविषयी सूक्ष्मातून ज्ञान जाणवणे, याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे परीक्षण’ असे म्हणतात. सनातनचे साधक गुरुकृपा आणि त्यांच्यातील सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता यांमुळे ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे परीक्षण’ करू शकतात. विविध धार्मिक कृती, यज्ञयाग आदींच्या वेळी होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारी अनेक परीक्षणे सनातनच्या ग्रंथांत समाविष्ट केली आहेत.

१४ इ. सूक्ष्म-ज्ञानाविषयीची चित्रे : चित्रांच्या स्वरूपात मांडले जाणारे ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे परीक्षण’ म्हणजे ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’. सात्त्विक वेशभूषा, सात्त्विक आहार, सात्त्विक अलंकार, धार्मिक कृती आदींच्या संदर्भातील सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया या चित्रांतून दर्शवली जाते.

१४ ई. ग्रंथांत ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे’ आणि ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची चित्रे’ प्रसिद्ध करण्यामागील उद्देश : आपण स्थूलातून एखादी कृती केल्यावर त्या कृतीचा सूक्ष्मातून काय परिणाम होतो, हे कळण्याची क्षमता बहुतांश व्यक्तींमध्ये नसते. सूक्ष्मातील परिणाम कळल्यावर स्थुलातील कृतीविषयी श्रद्धा निर्माण होते, तसेच तात्त्विक ज्ञानातील कठीण भाग समजायलाही सोपा होतो. यासाठी सनातनच्या ग्रंथांत ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे’ आणि ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची चित्रे’ प्रसिद्ध केली जातात. (क्रमश:)