पुणे – आजपर्यंत विविध प्रकरणांत अनेक जणांवर आरोप झाले; मात्र या प्रकरणात पुरावे समोर आल्याशिवाय कुणावरही कारवाई करणे उचित होणार नाही. मंत्री धनंजय मुंडे यांचे असे म्हणणे आहे की, या प्रकरणाशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही आणि कोणत्याही यंत्रणेकडून त्याची पडताळणी करून घेण्यासाठी ते सिद्ध आहेत. त्यामुळे जे दोषी नाहीत, त्यांच्यावर अकारण कारवाई होणे योग्य नाही. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईल. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विविध आरोप होत असतांना त्यांचे त्यागपत्र का घेतले नाही ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते बोलत होते.
या प्रकरणी अटकेत असलेले वाल्मिकी कराड यांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही. भाजपचे आमदार सुरेश धस जे आरोप करत आहेत त्या प्रकरणी त्यांनी पुरावे द्यावेत. ‘बडी मुन्नी ’कोण ते त्यांना विचारा. असल्या निरर्थक गोष्टींवर मी बोलणार नाही. मी सुरेश धस यांच्या बाबतीत बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना जे सांगायचे ते सांगितले आहे. काय तो योग्य निर्णय ते घेतील. इथून पुढे मी नाव घेऊन बोलेन. पालकमंत्री कुणाला करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. साखर कारखानाच्या प्रश्नाविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. पुण्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती सुधारली नाही, तर अधिकारी पालटावे लागतील असे मी पोलीस आयुक्तांना सांगणार आहे.’’