संभाजीनगर येथे जमावबंदी नाही, प्रसारमाध्यमांमधील वृत्त चुकीचे ! – निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता

संभाजीनगर – ‘शहरात आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे’, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांवर आले आहे; मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून शहरात कोणतीही जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही. सर्वच माध्यमांवर चुकीचे वृत्त दाखवण्यात येत आहे. कृपया अशा बातम्या आणखी प्रसारित करू नये, असे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी २६ एप्रिल या दिवशी स्पष्ट केले आहे.

२६ एप्रिल या दिवशी सकाळपासून प्रमुख मराठी वृत्तवाहिन्यांवर संभाजीनगर येथे कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार ५ हून अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून असे करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे, असे सांगितले जात होते. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की, संभाजीनगर पोलिसांनी केवळ ‘मुंबई पोलीस कायदा ३५’ अन्वये आदेश लागू केला आहे. असा आदेश आम्ही वर्षभर काढत असतो. सण-उत्सवांच्या वेळी कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, तसेच विविध मिरवणुकींसाठी या आदेशानुसार आम्ही मार्ग सुचवत असतो; मात्र ही नियमित चालणारी प्रक्रिया असते. या आदेशाचा अर्थ जमावबंदी लागू केली, असा होत नाही.

राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप अनुमती दिली नाही !

‘संभाजीनगर मराठा सांस्कृतिक मंडळा’त होणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप अनुमती दिली नाही. त्याविषयी निर्णय होताच पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली जाईल, असेही निखिल गुप्ता यांनी स्पष्ट केले.