सातारा, २० एप्रिल (वार्ता.) – सध्याच्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये टपालाने (पोस्टाने) तक्रारी पाठवण्यासह नागरिकांना ‘ई-मेल’ने तक्रार पाठवण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सातारा येथील अधिवक्ता धनंजय चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, सध्याच्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, कलम १५४ (३) मध्ये जर पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ कलम १५४(१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे गुन्ह्याची माहिती नोंदवण्यास नकार दिला, तर त्या अन्यायग्रस्त व्यक्तीने तक्रार किंवा माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांना टपालाने पाठवावी, अशी तरतूद आहे. सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक युग असून नागरिक सुशिक्षित झाले आहेत. त्यामुळे ‘ई-मेल’ वगैरेचा उपयोग होत असल्याने सध्याच्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, कलम १५४ (३) मध्ये टपालाने तक्रार पाठवण्यासोबत नागरिकांना ‘ई-मेल’ने तक्रार पाठवण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि तशी दुरुस्ती फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये करण्यात यावी.