मुंबई – मंदिरे, गड-दुर्ग आणि संरक्षित स्मारके यांचे जतन अन् संवर्धन शास्त्रोक्त अन् कालबद्धरित्या करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. १८ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन लेणी खोदणे, महावारसा सोसायटीची स्थापना करणे, गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे आदी विषयांचा आढावा घेतला. या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मंदिरे, गड-दुर्ग आणि संरक्षित स्मारके यांचे काम करतांना त्यांचे मूळ रूप, स्थानमाहात्म्य अन् इतिहास हे लक्षात घेऊन केले जावे. पहिल्या टप्प्यात ८ मंदिरांचा जीर्णोद्धार आणि त्यांच्या परिसराचा विकास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये धूतपापेश्वर (रत्नागिरी), कोपेश्वर (कोल्हापूर), एकवीरादेवी (पुणे), गोंदेश्वर (नाशिक), खंडोबा (संभाजीनगर), भगवान पुरुषोत्तम (बीड), आनंदेश्वर (अमरावती) आणि शिवमंदिर (गडचिरोली) या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. मंदिराचे मूळ रूप टिकवून त्यांचा विकास आराखडा करण्यात येणार आहे.’’
महाराष्ट्रातील या ८ मंदिरांचा होणार जीर्णोद्धार; राज्य सरकारचा निर्णय (बघा यादी) https://t.co/JDKdp05Cii
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 18, 2022
मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली अन्य सूत्रे
१. मंदिरांच्या परिसराचा विकास करतांना भाविकांच्या सोयीसुविधा, वाहनतळे, स्वच्छतागृहे, येण्या-जाण्याचा मार्ग यांचाही विचार करण्यात यावा. या ठिकाणी असलेल्या दुकानांची मांडणी ही एकसारखी असावी, म्हणजे भाविकांची असुविधा टाळता येईल.
२. एकवीरादेवीच्या मंदिराला जाण्यासाठी ‘रोप वे’ची सुविधा उपलब्ध करून देतांना भाविकांना न्यूनतम पायऱ्या चढाव्या लागतील, याचाही विचार व्हावा. सरकते जिने, तसेच ‘रोप वे’ यांची सुरक्षितता अभ्यासली जावी.
३. कोपेश्वर मंदिराला प्रतीवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा पडतो. त्यामुळे मंदिराची हानी थांबवता येईल, यासाठी अभ्यास करण्यात यावा. या मंदिराची तातडीची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांचे जतन आणि संवर्धन यांचे काम हाती घेण्यात यावे.
४. मंदिराच्या विकास आराखड्याला प्रशासकीय अनुमती देण्याची कार्यवाही या आठवड्यात पूर्ण होईल. यांतील ५ मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची मान्यता आवश्यक आहे. काही ठिकाणी वन विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.
५. पुढची काही शतके लोक या युगातील काम आणि वैशिष्ट्ये पाहू शकतील, अशा लेणी निर्माण करण्याच्या दृष्टीने योग्य स्थळे, शिल्पकार, स्थळांचा भौगोलिक अभ्यास करून एक उत्तम संकल्पचित्र सादर करण्यात यावे.
गडांच्या संवर्धनाचा आराखडा येत्या ३ मासांत सादर करावा ! – मुख्यमंत्री
दुर्गांचे पावित्र्य राखून त्यांचा विकास मूळ स्वरूपात व्हायला हवा. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या वास्तूविशारदांनी दुर्गांचे संवर्धन आराखडा येत्या ३ मासांत सादर करावा. वास्तूविशारदांनी जलदुर्गासह, दुर्गांचा इतिहास समजून घ्यावा, तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आराखडे सिद्ध करावेत. याविषयी दुर्गप्रेमी संघटनांची बैठक पुन्हा एकदा आयोजित करावी. या संघटनांकडे त्यांच्या क्षेत्रातील गड-दुर्ग यांची स्वच्छता राखण्याचे काम देण्याविषयी विचार केला जावा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.
या वेळी राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या दुर्गांचे जतन अन् संवर्धन यांच्या कामाच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.