हणजुणे, बार्देश, गोवा येथील श्री. बाबूराव गडेकर हे दुचाकी पायलट (दुचाकी टॅक्सीचालक) आहेत. साधना म्हणून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. वितरणाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. दैनिक वितरणाची सेवा करतांना दुचाकीत इंधन भरण्यासाठी लागणार्या पैशांची अडचण गुरुकृपेने सुटणे : ‘माझी आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरण सेवेला जाण्यासाठी दुचाकीमध्ये इंधन भरायला मला १-२ वेळा अडचण आली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना, ‘देवा, आता तूच सांभाळून घे’, अशी प्रार्थना करून वितरण सेवेला गेलो. घरापासून थोडे अंतर गेल्यावर एका व्यक्तीने मला थांबवले आणि त्याला कंदोळी येथे सोडायला सांगितले. मी त्याला दुचाकीत इंधन नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने दुचाकीची टाकी भरून इंधन घातले आणि भाड्याचे पैसेही दुप्पट दिले. त्यानंतर मी दैनिक वितरण केले. अशी अनुभूती मला आतापर्यंत २ वेळा आली आहे. या प्रसंगांतून ‘गुरुमाऊली कशी आपली काळजी घेते आणि आपल्याला काहीच अल्प पडू देत नाही’, याची मला अनुभूती आली.
१ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे : एकदा पितृपक्षात दैनिकांच्या वितरणाची सेवा करत असतांना मला पांढरा शर्ट, पांढरे धोतर, काळा कोट आणि डोक्यावर काळी टोपी घातलेली एक वयस्कर व्यक्ती हातात काठी घेऊन चालत असलेली दिसली. मी पुढे गेलो आणि दुचाकी वळवून त्या व्यक्तीकडे आलो. पहातो तर काय, ‘माझ्यासमोर साक्षात् प.पू. भक्तराज महाराज उभे होते.’ मी मनोमन त्यांना नमस्कार केला. त्यांनीही मला नमस्कार केला. ‘काय बोलू आणि काय करू ?’, अशी माझी स्थिती झाली होती. मला नमस्कार करून ते बसस्थानकाच्या दिशेने चालत गेले. ‘ते कुठे गेले आणि कुठच्या बसमध्ये चढले ?’, हे मला समजलेच नाही. त्यानंतर मी आनंदाने दैनिक वितरण पूर्ण केले.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून धन्यता वाटणे
‘आपल्या हिंदु धर्मातील सण आणि उत्सव शास्त्रानुसार कसे साजरे करावेत ?’, हे मला दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे कळले. सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध प्रकारचे यज्ञ होतात. त्याची माहिती दैनिकामुळे मिळते. ‘त्या यज्ञांचा मानवजातीला कोणता लाभ होणार आहे ?’, याविषयी सूक्ष्मातून जाणणार्या साधकांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण वाचून धन्य वाटते.
३. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवलेच माझ्याकडून ही सेवा करून घेतात आणि ही सेवा करण्यासाठी तेच मला शक्तीही देतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा मिळाली; म्हणून मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘त्यांनी माझ्याकडून अशीच सेवा करून घ्यावी’, ही त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’
– श्री. बाबूराव गडेकर, हणजुणे, बार्देश, गोवा. (१०.५.२०२१)
श्री. बाबूराव गडेकर यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे‘हणजुणे, बार्देश येथील श्री. बाबूराव गडेकर अनेक वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करत आहेत. आर्थिक अडचण असूनही ‘गुरूंचा प्रसाद सर्वांना मिळावा’, या हेतूने ते पाऊस, थंडी आणि ऊन यांची पर्वा न करता अविरतपणे दैनिकाच्या अंकांचे वितरण करतात. ‘सकाळी दैनिक वितरण केल्यावर पुष्कळ आनंद मिळतो आणि पुढची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात’, असे ते सांगतात. कधी वैयक्तिक कामामुळे दैनिक वितरण करायला उशीर झाला किंवा त्या दिवशी दैनिक वितरणाची सेवा करायला मिळाली नाही, तर ‘चुकल्या चुकल्यासारखे वाटते. त्या दिवशी मला चैनच पडत नाही’, असे ते सांगतात.’ – सौ. शर्वाणी शेखर आगरवाडेकर, म्हापसा, बार्देश, गोवा. (१०.५.२०२१) |
|