मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील विविध विभागांत जाऊन कर्मचाऱ्यांची केली आस्थेने विचारपूस !

कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल या दिवशी मंत्रालयातील सामान्य प्रशासन, गृह, विधी आणि न्याय, महसूल आदी विविध विभागांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली. उद्धव ठाकरे यांनी साधलेल्या संवादामुळे सर्व कर्मचाऱ्यांना उत्साह आला. या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्र्यांची कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीची चौकशी केली. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती कल्याणी धारप म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या विभागाला भेट देणे, ही गोष्ट चांगली वाटली. त्यांच्या आमच्याकडच्या ‘लेजर बुक्स’ पाहून त्याविषयी बारकाईने जाणून घेतले.’’ विविध विभागांतील अन्य कर्मचाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या अचानक भेटीने सुखद धक्का बसला. मुख्यमंत्र्यांनी आपुलकीने केलेली चौकशी कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंतच्या मंत्रालयाच्या इतिहासातील संस्मरणीय ठरणारी आहे.