ठाणे – लघुउद्योजकांची संघटना असलेली ‘टिसा’ आणि ‘चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन’चे (‘कोसिआ’) संस्थापक डॉ. मधुसूदन तथा अप्पासाहेब खांबेटे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथील ‘टिसा हाऊस’ येथे करण्यात आले. या वेळी लघुउद्योग क्षेत्राला चालना देणार्या त्यांच्या योगदानाचे शिंदे यांनी कौतुक केले. हा कार्यक्रम खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी चर्चाही केली.
खांबेटेंची आठवण काढतांना शिंदे म्हणाले की, मी आमदार झाल्यानंतर राज्यशासनाशी संबंधित अडचणी अप्पा मांडायचे. डॉ. अप्पासाहेबांचे कार्य, योगदान पुष्कळ मोठे आहे. ते सदैव लघुउद्योगांसाठी लढले. त्यांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.
मुख्यमंत्र्यांनी उपस्थित उद्योजकांना संबोधित करतांना आश्वासित केले की, आपले सरकार उद्योग आणि रोजगार वाढीसाठी काम करत आहे. राज्य उद्योग वाढीत आघाडीवर आहे. सेमीकंडक्टर उद्योगही महाराष्ट्रात आला असून मोठी गुंतवणूक राज्याने खेचून आणली आहे. त्यामुळे येथील एकही उद्योग विस्थापित होणार नाही. उद्योगांच्या अडचणींविषयी खासदार नरेश म्हस्के यांनाही मुख्यमंत्र्यांनी साहाय्य करण्याच्या सूचना दिल्या.