Bangladesh Independence Day : बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित राष्ट्रीय दिवस साजरे करण्याचे रहित !

  • बांगलादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या आठवणी पुसण्याची मोहीम !

  • नागरिक संतप्त !

ढाका (बांगलादेश) – महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशाला तालिबानच्या मार्गावर घेऊन जात आहे. शेख हसीना यांना हटवल्यानंतर स्थापन झालेले अंतरिम सरकार आता बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या शेख मुजीबुर रहमान यांच्या आठवणी पुसण्यासाठी मोहीम आखली आहे. शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित ८ राष्ट्रीय दिवस साजरे करण्याचे रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय १९७१ च्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात असल्याची टीका बांगलादेशी नागरिक करत आहेत.

बांगलादेशात पाकिस्तान विचारसरणीला चालना !

‘अवामी लीग’ने या निर्णयाविषयी म्हटले आहे की, हा प्रकार म्हणजे बांगलादेशात पाकिस्तानी विचारसरणीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. ५ ऑगस्ट या दिवशी बंगबंधूंचे पुतळे पाडण्यासह ऐतिहासिक चिन्हे पद्धतशीरपणे नष्ट करण्याचा प्रयत्न  करण्यात आला. बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित राष्ट्रीय  दिवसांनाही अंतरिम सरकारने लक्ष्य केले आहे. यात १७ मार्च हा राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय बालदिन’ म्हणून साजरा करणे रहित करण्याच्या, तसेच ४ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करणे रहित करण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. ‘अवामी लीग’ने लोकांना युनूस सरकारच्या अवैध कृत्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमधील सल्लागार नाहिद इस्लाम यांनी म्हटले आहे की, अंतरिम सरकार शेख मुजीबुर रहमान यांना राष्ट्रपिता म्हणून मान्यता देत नाही.