पंतप्रधान मोदी यांच्या शाहबाझ शरीफ यांना शुभेच्छा !

आतंकवादमुक्त प्रांत झाल्यास विकास कामांवर लक्ष केंद्रित करू शकू !

नवी देहली – पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानिमित्त शाहबाझ शरीफ यांचे अभिनंदन ! भारताला शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत आतंकवादमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.

असे झाल्यास आपण विकास कामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करू शकू आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांचे भले करण्यासमवेतच संपन्नता प्रदान करता येईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांना ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

पाकचे शाहबाझ शरीफ यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छांना उत्तर (म्हणे) ‘पाकिस्तान भारतासमवेत शांततापूर्ण संबंध ठेवण्यास इच्छुक !’

टाळी एका हाताने वाजत नाही. पाकने शांततापूर्ण संबंध ठेवण्याच्या कितीही गोष्टी केल्या, तरी त्या बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहेत, हे जगाला ठाऊक आहे. त्याला शाहबाझ शरीफही अपवाद नाहीत !

शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद ! पाकिस्तान भारतासमवेत शांततेचे आणि सहकार्याचे संबंध ठेवण्यास इच्छुक आहे. जम्मू-काश्मीरसमेवत सर्व प्रलंबित सूत्रांवर शांततेने तोडगा काढणे आवश्यक आहे. पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात युद्ध करतांना दिलेल्या प्राणांचे बलीदान जगाला ठाऊक आहे. चला शांततेला सुरक्षित करूया आणि लोकांच्या सामाजिक अन् आर्थिक विकासाकडे लक्ष देऊया, अशा शब्दांत पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छांवर आभार मानतांना म्हटले आहे.