हिंदु राष्ट्राची स्थापना हेच माझे एकमेव लक्ष्य ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे श्रीरामनवमीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

डावीकडून आमदार टी. राजा सिंह. हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस

भाग्यनगर (तेलंगाणा) – मी मृत्यूला घाबरत नाही. माझे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’, असे प्रतिपादन येथील गोशामहल विधानसभा क्षेत्राचे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी काढले. आकाशपुरी येथील हनुमान मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात प्रचंड संख्येने हिंदू सहभागी झाले होते. सुलतान बाजारातील हनुमान व्यायामशाळेमध्ये या मिरवणुकीची सांगता होऊन तेथे त्याचे धर्मसभेमध्ये रूपांतर झाले. या वेळी व्यासपिठावर आमदार टी. राजा सिंह यांच्यासमवेत हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेसुद्धा उपस्थित होते.

सभेला संभोदित करताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी

… अन्यथा प्रत्येक मशिदीच्या आजूबाजूला दिवसातून ५ वेळा ‘हनुमान चालिसा’ लावण्यात येईल ! – आमदार टी. राजासिंह

आमदार टी. राजासिंह

मिरवणुकीच्या वेळी उपस्थित हिंदूंना संबोधित करतांना टी. राजा सिंह म्हणाले की, आजचे हिंदु कुंभकर्णाप्रमाणे झोपलेले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करावे लागतात. मिरवणुकीला पोलिसांमुळे उशीर झाला. पोलीस म्हणाले, ‘रात्री १० नंतर स्पीकर लावता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तुमच्यावर गुन्हा नोंदवावा लागेल.’ मी पोलिसांना विचारू इच्छितो की, गोहत्येवरही कायदा आहे; मात्र तरीही गाय आणि वासरू यांच्या हत्या होतात, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा कायदा त्यांच्यावर लागू होत नाही का ? न्यायालयाचा निर्णय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपक न वापरण्याचा आहे; मात्र प्रतिदिन पहाटे ५ वाजताच भोंग्यांवरून अजान ऐकवली जाते. न्यायालयाचा कायदा तेलंगाणा राज्यात लागू करा अन्यथा प्रत्येक मशिदीच्या आजूबाजूला दिवसातून ५ वेळा हनुमान चालिसा स्पीकरवर लावण्यात येईल. सर्वांसाठी समान कायदा आहे, तर त्यांना बंद करण्यास सांगा. मग आम्हीही बंद करू.