आजगे (लांजा) येथील हिंदु जनजागृती समितीची हिंदु-राष्ट्र जागृती सभा
लांजा, १० एप्रिल (वार्ता.) – इस्रायल देशाच्या अवतीभोवती सोळा मुस्लिम राष्ट्रे आहेत, तर भारताच्या शेजारी तीनच मुस्लिम राष्ट्रे आहेत. तरीही आपली दयनीय स्थिती झाली आहे. इस्रायलचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्यापेक्षा अल्प आहे, तरीही ते समर्थपणे शत्रू राष्ट्रासमोर ताठ मानेने उभे आहेत. भारतियांनी सर्वधर्मसमभावाची विचारसरणी अवलंबली आहे. त्यामुळे केवळ हिंदूंनीच स्वतःची अपरिमित हानी करून घेतली आहे. जगात प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा असा एक धर्म आहे, मग केवळ भारतातच सर्वधर्मसमभाव का ? हिंदूंवर होणार्या आघातांना सामोरे जायचे असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी मांडले. क्रांतीकारक बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांच्या स्मृतीदिनी तालुक्यातील आजगे गावातील दत्तमंदिराच्या प्रांगणात ८ एप्रिल २०२२ च्या सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु-राष्ट्र जागृती सभा झाली. या सभेत मार्गदर्शन करतांना श्री. पानवळकर बोलत होते. या सभेसाठी २०० धर्मप्रेमी हिंदूंची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन कु. मृण्मयी कात्रे यांनी केले.
या सभेचा प्रारंभ आजगे गावातील दत्तमंदिराचे प्रमुख विश्वस्त श्री. दत्तात्रय महाराज, ह.भ.प. मनोहर (दादा) रणदिवे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर श्री. दत्तात्रय महाराज, तसेच ह.भ.प. मनोहर (दादा) रणदिवे, ह.भ.प. दर्शन आग्रे यांचा सन्मान सनातन संस्थेचे साधक श्री. उदय केळुसकर यांनी केला. आजगे गावाच्या सरपंच सौ. अनुष्का गुरव यांचे स्वागत समितीच्या सौ. रेवती पेडणेकर यांनी केले. दत्तमंदिर विश्वस्त श्री. विकास मांडवकर, गावकार श्री. काशीनाथ मांडवकर यांचे स्वागत सनातनचे साधक श्रीराम करंबेळे यांनी केले, तर सभेचे वक्ते श्री. विनय पानवळकर यांचे स्वागत श्री. अनील मांडवकर यांनी केले.
क्षणचित्रे
१. सभेस्थळी समितीच्या प्रथमोपचार या उपक्रमाविषयी जनजागृती होण्यासाठी कक्ष उभारण्यात आला होता.
२. समाजकंटकांनी आक्रमण केल्यास स्वरक्षण कसे करावे ? याची प्रात्यक्षिके या वेळी दाखवण्यात आली.
३. सभेपूर्वी जोराचा वारा आणि थोडा पाऊसही पडत होता. सर्व धर्माभिमान्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे सभेला कोणताच अडथळा आला नाही.
मान्यवरांचे अभिप्राय
१. ह.भ.प. गोविंद चव्हाण ( दैनिक ‘सागर’चे पत्रकार)- सभेमधून सर्व तरुणवर्गाला धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी काय करायला पाहिजे ? याचे मार्गदर्शन झाले.
२. ह.भ.प. दर्शन आग्रे – हरिपाठ आणि राष्ट्रकार्य यांचा संबंध कसा आहे ? हे या सभेमुळे लक्षात आले.
३. ह.भ.प. नारायण पालीये – आम्ही वारकरी यापुढेही समितीच्या कार्यक्रमात सहभागी होत राहू.
४. श्री. विलास मांडवकर – सभेतील विचार घराघरांत पोचण्यासाठी प्रयत्न करू .
५. श्री. गोपाळ चिले (निवृत्त पोस्टमास्तर) – सभेत ज्वलंत विचार ऐकायला मिळाले.
६. सौ. गीतांजली मांडवकर – राष्ट्रजागृती सभेमुळे आमच्यामध्ये नवचैतन्य संचारले आहे.
उद्या सभेची आढावा बैठक
१२ एप्रिल २०२२ च्या रात्री ८ वाजता आजगे येथील दत्तमंदिरामध्ये आढावा बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीला धर्माभिमान्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.