भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोह, भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करा !

संभाजीनगर येथील शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

संभाजीनगर – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात येथील शिवसेनेच्या वतीने तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आय.एन्.एस्. विक्रांत भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यावर संजय राऊत यांनी आरोप केले होते. देशद्रोह, भ्रष्टाचार आणि फसवणूक केल्याप्रकरणी सोमय्या यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घौडेले, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

भाजपचे किरीट सोमय्या यांनी आय.एन्.एस्. विराट जहाज वाचवण्यासाठी गोळा केलेल्या ५८ कोटी रुपयांचा निधी हडप केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ही तक्रार प्रविष्ट केली आहे. शिष्टमंडळाने क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

रक्कम गेली कुठे ?

किरीट सोमय्या यांनी देशाची संरक्षणव्यवस्था आणि देशभावनेची फसवणूक केली आहे. भाजपचा झेंडा घेऊन किरीट सोमय्या यांनी ५८ कोटी रुपये गोळा केले आहेत. हा आकडा १०० कोटी रुपयांचा असेल. ही रक्कम राजभवनात जमा झाली नसेल, तर गेली कुठे ? भाजपने ही रक्कम निवडणुकीत वापरली कि सोमय्या यांच्या ‘इन्फ्रा’मध्ये वळवली ? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.