भोंसला (जिल्हा नाशिक) येथील सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून मुलींची छेड काढणाऱ्या दोघांना चोप !

स्वरक्षण प्रशिक्षण घेतल्याचा लाभ झाल्याचे विद्यार्थिनींचे मत

  • टवाळखोरांना क्षात्रवृत्तीने धडा शिकवणाऱ्या भोंसला येथील सैनिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे अभिनंदन ! – संपादक 
  • टवाळखोरांची संख्या पहाता स्वरक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण अत्यावश्यक आहे, हे दर्शवणारा प्रसंग ! – संपादक 
  • संघटितपणे प्रतिकार केल्यास टवाळखोरांना रोखणे शक्य आहे, हे लक्षात घेऊन मुलींनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. – संपादक 
छेड काढणाऱ्या टवाळखोरांना धडा शिकवणाऱ्या रामदंडी

नाशिक – देवदर्शनासाठी आलेल्या मुलींची छेड काढणाऱ्या दोघांना भोंसला येथील सैनिकी विद्यालयातील विद्यार्थिनींनी चोप दिला. यावर न थांबता विद्यार्थिनींनी दोघा टवाळखोरांना पोलिसांच्या कह्यात दिले. स्वरक्षणाचे थोडेफार प्रशिक्षण घेतलेले असले, तर त्याचा निश्चित लाभ होतो याचा प्रत्यय सोमेश्वर येथे आला.

१. भोंसला सैनिकी विद्यालयाच्या रामदंडी (क्षात्रवृत्तीने लढा देणाऱ्या महिलांना  ‘रामदंडी’ असेही म्हणतात.) मुली फिरण्यासाठी ३ एप्रिल या दिवशी सोमेश्वर येथे गेल्या होत्या.

२. त्या वेळी ५ टवाळखोरांनी या मुलींना पाहून टोमणे मारण्यास आणि अपशब्द उच्चार करण्यास प्रारंभ केला. मुलींनी प्रारंभी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तरीही त्यांची छेडछाड चालूच होती. त्यास आक्षेप घेताच टवाळखोर भांडायला उभे राहिले. त्यांनी मुलींना धक्के मारायला प्रारंभ केला. एका मुलीवर हात उचलल्यानंतर मात्र सर्व रामदंडींनी सांघिकतेचे दर्शन दाखवत या टवाळखोरांना बेदम चोप देण्यास प्रारंभ केला.

३. त्यातील एका टवाळखोराने खिशातील भ्रमणभाष काढत आणखी इतर मित्रांनाही बोलावले. तोच मुलींनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकाला संपर्क साधत पोलिसांना बोलावले. पोलीस त्वरित घटनास्थळी आले.

४. पोलिसांनी संबंधित ५ जणांना कह्यात घेत त्यांना या रामदंडी विद्यार्थिनी आणि नागरिक यांच्यासमोर उठाबशा काढायला लावल्या, तसेच पुन्हा अशा प्रकारे अपवर्तन करणार नाही, असे टवाळखोरांकडून वदवून घेऊन त्यांना कह्यात घेतले.

या घटनेनंतर रामदंडी मुली तातडीने महाविद्यालयाच्या वसतीगृहाकडे परतल्या. त्यांच्या धाडसी कृतीमुळे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी आणि प्राध्यापक यांच्या हस्ते त्यांना ‘रामदंडी’ हा बॅच देऊन गौरवण्यात आले.