अमेरिकेने गुप्तपणे केली ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची चाचणी !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने नुकत्याच एका ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची गुप्तपणे चाचणी केल्याचे वृत्त सी.एन्.एन्. या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने रशियन सरकारचे मुखपत्र ‘रशिया टुडे’ने दिले आहे. ‘रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू असून यामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध ताणले आहेत. या क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती रशियाला मिळाल्यास त्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, या भीतीपोटी बायडेन प्रशासनाने या चाचणीविषयी गुप्तता पाळली, असे सी.एन्.एन्.चे म्हणणे आहे.

सी.एन्.एन्. च्या सूत्रांनुसार हे ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र अमेरिकेच्या पश्चिम तटावरून प्रक्षेपित करण्यात आले. हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये अमेरिका ही रशिया आणि चीन यांच्यापेक्षा मागे आहे, असे म्हटले जाते.

‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राचे महत्त्व !

‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची गती ही ध्वनीच्या गतीपेक्षा पाच पटींनी अधिक (साधारण १७०० मीटर प्रति सेकंदहून अधिक) असते. या क्षेपणास्त्राला कोणतीही क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली नष्ट करू शकत नाही. हे क्षेपणास्त्र वाहून नेत असलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये नियोजित ठिकाणावर गतीने वार करण्याची क्षमता असते.