सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्य हिंदूंवर अन्याय करणारी धर्मनिरपेक्षता उपयोगाची नाही. भारतात खरंच सेक्युलर व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न पडतो. भारतीय राज्यव्यवस्था केवळ अल्पसंख्यांकांच्या हितासाठी कार्यरत असून सेक्युलर व्यवस्था ही एक खोटी म्हणजेच बनावट व्यवस्था बनली आहे. तिचा उपयोग हिंदूंवर अन्याय करण्यासाठी होत आहे, अशी टीका हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी केली. ३ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजता वडूज येथील सातेवाडी गावात श्री जानुबाई मंदिरात ही सभा पार पडली. या वेळी त्या बोलत होत्या.
हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या या सभेला डांबेवाडीचे सरपंच किशोर बागल, सातेवाडीचे युवा नेतृत्व विक्रम रोमन, अधिवक्ता गजानन फडतरे, अधिवक्ता सोमनाथ भरमगुंडे, समाजसेवक नितीन पाटील, माजी सरपंच कृष्णराव बनसोडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, डांबेवाडीचे युवा नेते महेश थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते. सातेवाडी आणि पंचक्रोशीतील १०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी या सभेचा लाभ घेतला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला प्रारंभ झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातेवाडीचे माजी भरत रोमन, निखिल रोमन आणि आर्यन बोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रविना शेंडे यांनी, तर आभारप्रदर्शन विनायक ठिगळे यांनी केले. श्री. दीपक डाफळे यांनी उपस्थितांना ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ’ देऊन सभेची सांगता झाली.
क्षणचित्रे
१. श्री. अशोक फडतरे यांनी साधकांची चहा-पान, भोजन आणि बैठक व्यवस्था केली.
२. महिला सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी सभेचे वक्त्या सौ. रूपा महाडिक यांचा सत्कार केला.
३. सभास्थळी कश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांविषयी जागृती होण्यासाठी ‘फॅक्ट’चे प्रदर्शन लावण्यात आले होते.
४. सभास्थळी सनातननिर्मित ग्रंथांचे आणि क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.