मेणवली (सातारा) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’
सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – आमच्यासाठी राष्ट्र आणि धर्म वेगळे नाहीत. आमचे धर्मपुरुष हे सर्व राष्ट्रपुरुष आहेत. सर्व राष्ट्रपुरुष धर्म पाळणारे आहेत. आम्ही देवतांचे चरण धुतांनाही ‘या राष्ट्राळा बळ प्राप्त होवो !’, असा मंत्र म्हणतो. धर्माचे सर्व मंत्र राष्ट्रकल्याणाचेच नव्हे, तर विश्वकल्याणाचे आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणारच आहे, असा विश्वास हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी व्यक्त केला. वाई तालुक्यातील मेणवली येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा पार पडली. तेव्हा ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मेणवली यांच्या संयुक्त विद्यमाने मारुति मंदिर परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली होती.
प्रारंभी मेणवली गावच्या सरपंच सौ. लक्ष्मी वेदपाठक, उपसरपंच संजय चौधरी, सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन अन् शंखनाद करण्यात आला. या कार्यक्रमाचा लाभ मेणवली आणि पंचक्रोशीतील २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी घेतला. सभेचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन धारकरी रोहन निंबाळकर अन् साधिका कु. रविना शेंडे यांनी केले. उपस्थितांना धारकरी सूरज मांढरे यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
क्षणचित्रे
१. सभा संपेपर्यंत एकही श्रोता जागेवरून उठला नाही.
२. धारकरी विशाल निंबाळकर यांनी वीरश्री निर्माण करणारे श्लोक म्हटले.
३. ग्रामस्थ आणि धारकरी यांचा सभेच्या प्रसारात आणि पूर्वसिद्धतेत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
४. सभास्थळी काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवरील ‘फॅक्ट’चे प्रदर्शन लावण्यात आले होते.