एका नव्या प्रारंभासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी निर्बंध हटवत आहोत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाविषयीचे सर्व निर्बंध हटवण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – गुढीपाडव्यापासून (२ एप्रिलपासून) महाराष्ट्रातील कोरोनाविषयीचे सर्व निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. ३१ मार्च या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘गुढीपाडवा म्हणजे नववर्षाचा प्रारंभ आहे. जुने मागे सारून नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस आहे. एक नवीन प्रारंभ करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी निर्बंध हटवत आहोत’, असे म्हटले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध लावल्यापासून ७३६ दिवसांनी राज्यातील निर्बंध हटवण्यात येत आहेत. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मागील २ वर्षांपासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या प्रतिकार केला. आता हे सावट दूर होत आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कायदा, तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा यांद्वारे कोरोनाच्या काळात लावण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे उठवण्यात येत आहेत; मात्र  भविष्यात कोरोनाचा धोका उद्भवू नये, यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. सर्वांनी आरोग्याचे नियम पाळून स्वत:सह अन्यांचीही काळजी घ्यावी. मागील २ वर्षांपासून राज्यातील डॉक्टरांसह सर्व ‘फ्रंटलाईन’ आणि नागरिक यांनी कोरोनाशी लढतांना राज्यशासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, याविषयी सर्वांचे मनापासून आभार मानतो.’’