‘एस्.टी.’च्या संपामुळे इयत्ता १० आणि १२ च्या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोचवण्यात अडथळे !

‘एस्.टी.’च्या संपाचा परिणाम लक्षात घेऊन यावर आतातरी तोडगा निघणार का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

निकाल वेळेत लावण्याचा विभागीय शिक्षण मंडळाचा प्रयत्न !

संभाजीनगर – इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा चालू आहेत. परीक्षेसमवेतच उत्तरपत्रिकांच्या पडताळणीची प्रक्रियाही चालू आहे; मात्र एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पडताळलेल्या उत्तरपत्रिका जमा करणे आणि पडताळणीसाठी उत्तरपत्रिका पाठवण्यात अडथळे येत आहेत, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाने दिली आहे. अडथळे असले, तरी निकाल वेळेतच लागेल, असेही मंडळाने म्हटले आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा ४ मार्चपासून चालू झाल्या आहेत. २८ मार्च या दिवशी पहिल्या पेपरच्या उत्तरपत्रिका पूर्ण पडताळून मंडळात जमा होणे आवश्यक होते. मंडळाच्या नियमानुसार पेपर झाल्यापासून २१ दिवसांच्या आत उत्तरपत्रिका पडताळून त्या जमा करणे आवश्यक आहे; मात्र ‘एस्.टी.’चा संप, तसेच शिक्षकांनी पेपर पडताळणीस नकार दिल्याने २८ मार्च या दिवशी उत्तरपत्रिका जमा झाल्या नाहीत, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.