महाराष्ट्रातील ५५ साखर कारखान्यांची अवैध विक्री करून सहकारक्षेत्रावर दरोडा टाकण्यात आला ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

या गंभीर आरोपांची सरकारने चौकशी करावी !

प्रवीण दरेकर

मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – आपल्याच कह्यात असलेल्या राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांकडून अनुउत्पादक कर्ज घ्यायचे, कारखाने बुडित काढून पुन्हा सहकारी बँकेच्या कह्यात द्यायचे आणि अल्प किमतीमध्ये हेच कारखाने विकत घेऊन पुन्हा सहकारी बँकांची लूट करायची. अशा प्रकारे महाराष्ट्रातील ५५ साखर कारखान्यांची अवैधरित्या विक्री करून सहकारक्षेत्रावर दरोडा टाकण्यात आला, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. २२ मार्च या दिवशी २६० च्या प्रस्तावावर बोलतांना त्यांनी वरील आरोप केले.

या वेळी प्रवीण दरेकर म्हणाले,

१. साखर कारखानदारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे; मात्र पुढार्‍यांनी त्यांची वाट लावली. साखर कारखाने म्हणजे खायची कुरणे झाली आहेत. साखर कारखान्यांना अपुर्‍या तारणावर कोट्यवधी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला. त्यामुळे ही कर्जे असुरक्षित झाल्याचे चौकशीत आढळून आले.

२. महाराष्ट्रात चालू करण्यात आलेल्या २०२ पैकी सध्या केवळ १०१ साखर कारखाने चालू आहेत. या कारखान्यांना विविध प्रकारे देण्यात आलेल्या ४ सहस्र १०० कोटी रुपयांची वसुली शिल्लक आहे.

३. नागरिकांनी कष्ट करून दिलेल्या करांतून या जनतेच्या पैशांची लूट करण्यात आली. यांतील ३ सहस्र ८६८ कोटी रुपये थकवण्यात आले आहेत. ही साखर चळवळीची फसवणूक नाही का ? वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने साखर कारखाने काढून त्यामध्येही भ्रष्टाचार करण्यात आला.

४. सहकारी सूतगिरण्या, सहकारी यंत्रमाग कारखाने, कृषी सहकारी संस्था आदी क्षेत्रांत कोट्यवधी रुपयांची कर्जे देऊन ते बुडीत काढण्यात आले. या बुडीत संस्थांकडे बघायला सरकारला वेळी नाही.

५. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळा हा देशातील सर्वांत सुनियोजित घोटाळा आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाने या अधिकोषातील घोटाळ्याची चौकशी चालू आहे.

६. राज्यातील एकूण जिल्हा सहकारी बँकांतील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबई याच बँका व्यवस्थित चालू आहेत. आम्ही सहकार बुडवला नाही, तर जपण्याचे काम केले.