|
संभाजीनगर – शहरातील अनेक शाळांमध्ये इयत्ता १२ वीच्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांकडून नक्कल (कॉपी) केली जात असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यासाठी शाळेकडूनच विद्यार्थ्यांना साहाय्य केले जात आहे. या प्रकरणी एका शाळेची कायमस्वरूपी मान्यताही रहित करण्यात आली आहे. ‘शाळेची मान्यता रहित होऊ नये’; म्हणून शाळेत परीक्षा केंद्र असलेल्या अनेक संस्थांनी १९ मार्च या दिवशी इयत्ता १० वीची इंग्रजी विषयाची परीक्षा चालू असतांना प्रवेशद्वाराला चक्क कुलूप लावले. ‘मुलांना सामूहिक कॉपी करता यावी’, ‘भरारी पथक आले, तरी कुलूप उघडेपर्यंत ‘कॉपी’ नष्ट करण्यासाठीच हा खटाटोप आहे’, असे विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले; मात्र अशा शाळांच्या विरोधात कारवाईचे धाडस तेही दाखवू शकले नाहीत. इंग्रजीच्या परीक्षेला १ लाख २६ सहस्र ८१६ विद्यार्थी उपस्थित होते, तर ७ सहस्र ८० अनुपस्थित होते. लासूर स्टेशन येथे २, तर पैठण रस्त्यावरील आर्य चाणक्य विद्यालयात कॉपीची ७ प्रकरणे उघडकीस आली. विद्यार्थ्यांना कॉपी करता यावी; म्हणून अनेक शाळांच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.