२० मार्च या दिवशी सकाळी ११.३० वाजता झाले अंत्यसंस्कार
रत्नागिरी, २० मार्च (वार्ता.) – देवीहसोळ, तालुका राजापूर येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांनी १९ मार्च २०२२ या दिवशी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या निवासस्थानी देहत्याग केला. २० मार्च या दिवशी सकाळी ११.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. या वेळी पू. वागळेआजोबा यांचे घरातील नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
‘पू. वागळेआजोबांनी देह ठेवल्यानंतरही निवासस्थानातील वातावरण उत्साही असल्याचे अनेकांना जाणवले. ‘पू. वागळेआजोबा गेले’, असे वाटत नव्हते. त्यांचा चेहरा बोलका जाणवत होता. वातावरणात पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य जाणवत होते. घरातही चैतन्यदायी वातावरण पसरले होते. अनेकांचा नामजप चांगला होत होता’, असे त्यांचे पुतणे श्री. पुरुषोत्तम वागळे यांनी सांगितले. १५ फेब्रुवारी २०१७ या दिवशी पू. जनार्दन वागळेआजोबा हे सनातनच्या ६५ व्या संतपदी विराजमान झाले होते.