पनवेल – न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या न्हावा गावातील ७८९ मच्छिमारांना हानीभरपाई मिळावी, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी एम्.एम्.आर्.डी.ए.चे आयुक्तांकडे केली आहे. १७ मार्च या दिवशी याविषयी आयुक्तांच्या बांद्रा कार्यालयातील बैठकीत त्यांनी ही मागणी केली. या वेळी आयुक्तांनी याविषयीच्या कागदपत्रांच्या संदर्भातील त्रुटी दूर करण्याचे आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीला एम्.एम्.आर्.डी.ए.चे अधिकारी, पंचायत समिती सदस्या रत्नाताई घरत, न्हावा ग्रामपंचायत सरपंच हरेश्वर म्हात्रे आदी उपस्थित होते.
वर्ष २०१६ ते २०१९ पर्यंत ज्यांना अर्ज भरूनही पैसे दिले नाहीत, त्याविषयी लवकर निर्णय न घेतल्यास काम बंद केले जाईल, अशी रोखठोक भूमिका या बैठकीत घेण्यात आली होती. त्या वेळी आयुक्तांनी संबंधित अधिकारी स्वतः या न्हावा भागात येऊन कागदपत्रांच्या त्रुटी दूर करतील, असे आश्वासन दिले. न्हावा आणि गव्हाण ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्याचे अधिकार्यांनी मान्य केले आहे.