५ राज्यांमधील पराभव जिव्हारी लागल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी संबंधित राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे त्यागपत्र मागितले आहे, असे वृत्त आहे. सर्वांत जुना आणि मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची आता इतिहासजमा अन् अस्तित्व नसलेला पक्ष होण्याकडे वाटचाल चालू आहे. यापूर्वीच्या लोकसभेच्या आणि राज्यांमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ला आहेच ! ज्याच्या नावातच परकीय शब्द आहे, त्या पक्षाने संस्कृतीप्रधान भारतावर ६ दशके निर्विवादपणे राज्य केले, हे एक आश्चर्य आहे, नव्हे ते चीड आणणारेच आहे. काँग्रेस पक्षाची स्थापनाच मुळी इंग्रजांच्या कार्यकाळात इंग्रजांना भारतातून ते निघून गेल्यानंतरही त्यांची पाळेमुळे टिकवून ठेवण्यासाठी केली होती, हे काही उल्लेखांमधून आणि काँग्रेसच्या वाटचालीतून लक्षात येते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मवाळ राजकारणी लोकांचा अधिक भरणा या काँग्रेसमध्ये होता आणि त्यांचीच चलतीही होती. नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारख्या जहाल राष्ट्रवादी लोकांचा काँग्रेसने नेहमीच दु:स्वास केला आणि ते काँग्रेसच्या प्रवाहापासून बाहेर कसे रहातील ? याची काळजी घेतली.
काँग्रेसच्या फसव्या घोषणा
काँग्रेसवाले अद्यापही ते स्वत: शासनकर्ता पक्ष होण्याच्या भासमान जगात वावरत आहेत, असे दिसते. काँग्रेसला त्यांची मुळे या भारतभूमीत घट्ट मूळ धरल्यासारखी वाटली होती; मात्र प्रत्यक्षात तसे नाही. ‘सेक्युलर’ (निधर्मी) हिंदू, हिंदुद्वेषी आणि काँग्रेसी वृत्तीची प्रसारमाध्यमे, देशहित गहाण ठेवून परिवारवादाचे पूजन करणारे लोक, धर्मांध समूह या सर्वांच्या आधाराने काँग्रेसचा विषवृक्ष तग धरून होता. काँग्रेसची नाळ कधीच या देशाशी जोडलेली नव्हती. भारताबाहेरून आलेल्या इंग्रजांनी जो पक्ष स्थापन करण्यास हातभार लावला, तो राष्ट्रप्रेमी आत्मसात् करतील कसा ? आता देशातील हिंदु मन जागृत होत आहे. काँग्रेसने एवढ्या दशकांमध्ये देशाला धोकाच दिला आहे.
‘गरिबी हटाव’च्या मुखवट्या आड ‘हिंदु हटाव’ही भूमिका घेतली होती. ‘गरिबी हटाव’च्या घोषणा देणारे श्रीमंत झाले आणि गरीब हा आणखी गरीब झाला. अजूनही दारिद्र्यरेषेखालील लोकांची प्रचंड संख्या याची पुष्टी देते. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या लोकप्रिय घोषणेची ‘मर जवान, मर किसान’ अशी स्थिती करण्यास काँग्रेसच उत्तरदायी आहे. ‘काँग्रेसका हात गरिबोंके साथ’ हे जनतेने कधी अनुभवलेच नाही; पण ‘काँग्रेसका हात देशविरोधियोंके साथ और देशप्रेमीओंको लाथ’, हे मात्र पदोपदी अनुभवले. काश्मीरमधील फुटीरतावादी यासीन मलिक, सय्यद गिलानी यांच्या कारवायांना विरोध न करणे, बांगलादेशींना आसाममध्ये घुसवणारे फकरूद्दीन अली अहमद यांना राष्ट्रपती बनवणे, मालेगाव बाँबस्फोटात अटक केलेल्या धर्मांध आरोपींना सोडून अस्तित्वात नसलेला ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी निष्पाप हिंदूंना अटक करणे, या घटनांमधून त्याचा प्रत्यय येतो.
काँग्रेसचे कर्तृत्व (?)
काँग्रेसचे कर्तृत्व काय ? असा प्रश्न जेव्हा येतो, तेव्हा काँग्रेसने ‘इस्रो’ उभारली, शाळा-महाविद्यालये उभारली, कारखाने उभारले (बहुसंख्य काँग्रेसींचे, नंतर राष्ट्रवादीत गेलेल्यांचे स्वत:च्या मालकीचे साखर कारखाने उभारले), संशोधन संस्था स्थापन केल्या इत्यादी सूत्रे सांगितली जातात. एका स्वतंत्र देशात या गोष्टी करणे, हे शासनकर्ता पक्षाचे नैतिक कर्तव्यच आहे, त्यात मोठेपणा घेण्याचे काय काम ? नाहीतर शासनकर्त्यांचे काम तरी काय ? काँग्रेसने काय केले, याचा काँग्रेसवाले गवगवा करतात.
काँग्रेसने देशावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज निर्माण केले. भारतात जन्माला येणार्या प्रत्येक बाळावर सध्या ३२ सहस्र रुपयांचे कर्ज आहे. भारतात अल्पसंख्यांकांसाठी अनेक योजना, त्यांची धार्मिक स्थळे सरकारी नियंत्रणातून मुक्त, त्यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्याची मुभा, वक्फ बोर्ड, चर्च यांच्याकडे सहस्रो एकरच्या भूमी आहेत. याउलट हिंदूंना यांपैकी कोणतीही व्यवस्था नाही, हिंदूंना कुठेच धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था ठेवली नाही, ना त्यांची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त ठेवली आहेत. हिंदुविरोधी कायदे करण्यास काँग्रेसने पुढाकार घेतला आहे आणि हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न केला. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालनाचे टोक म्हणजे हिंदूंचा द्वेष ! भारतात बहुसंख्येने हिंदु समाज आहे; मात्र तो अस्तित्वहीन व्हावा, यासाठी काँग्रेसने अनेक प्रयत्न केले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची एक कविता गायल्याने आकाशवाणीतून त्यांचे त्यागपत्र घेण्यात आले. काँग्रेस राष्ट्रप्रेमी आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्यांचा एवढा द्वेष करते.
‘द काँग्रेस फाइल्स’ बनवावा का ?
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मीर येथे वर्ष १९९० मध्ये तेथील धर्मांधांकडून काश्मिरी पंडितांचा वंशविच्छेद झाला. तेव्हा काँग्रेसने बघ्याची भूमिका घेतली आणि काश्मिरी हिंदूंना आतंकवाद्यांकडून मारले जाण्यासाठी सोडून दिले.
काँग्रेसच्या काळातच गोवंशियांच्या हत्या वाढल्या, धर्मांतराचे प्रमाण वाढले, देशावर आणीबाणी लादली. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यावर लाखो भारतियांचे डोळे उघडले आणि त्यांनी ‘आजवर आम्हाला हे का समजले नाही ?’, असा प्रश्न केला. काँग्रेसचे खरे स्वरूप लोकांना कळण्यासाठी ‘द काँग्रेस फाइल्स’ असा चित्रपट कुणी बनवल्यास भारतियांना तिचे भयंकर स्वरूप कळेल आणि आम्ही ‘खलनायकाला आतापर्यंत नायक बनवण्याचा प्रयत्न केला’, याविषयी ते आत्मवंचना करतील, हे निश्चित !