इंदूर येथे प.पू. रामानंद महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ‘श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज’ या सनातनच्या ग्रंथाचे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन !

डावीकडून डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, श्री. शरद रामकृष्ण बापट, लेखक आणि भक्त श्री. अशोक काशिनाथ भांड आणि श्री. राजेंद्र चंद्रकांत भवरासकर

इंदूर, १४ मार्च (वार्ता.) – येथील ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने १२ आणि १३ मार्च या दिवशी प.पू. रामानंद महाराज यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. १३ मार्च या दिवशी ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक पारमार्थिक सेवा ट्रस्टद्वारे ‘श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज’ या सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. अशोक भांड हे या ग्रंथाचे लेखक आहेत. या वेळी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, श्री. शरद रामकृष्ण बापट, लेखक आणि भक्त श्री. अशोक काशिनाथ भांड, श्री. राजेंद्र चंद्रकांत भवरासकर आणि अन्य भक्त उपस्थित होते.

प.पू. रामानंद महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १२ मार्च या दिवशी सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत ‘श्री स्तवन मंजिरी आणि रामानंद बावनी पाठ’, सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत येथील चैतन्य भजनी मंडळाच्या वतीने पंडित राजेश दुबे यांनी आयोजित केलेले ‘श्री सुंदरकाण्ड पाठ’आदी कार्यक्रम झाले.

१३ मार्च या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत ‘श्री स्तवन मंजिरी आणि रामानंद बावनी पाठ’, सकाळी १० ते ११.३० या वेळेत श्री. शरद बापट प्रस्तुत ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ हा चिंतनाचा कार्यक्रम झाला. सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत ‘श्रीं’च्या पादुकांवर रुद्राभिषेक झाला. रात्री ९.३० वाजता पारंपरिक भजनाचा कार्यक्रम झाला.