‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा !

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा आणि नितेश राणे यांची मागणी

मुंबई – भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडून ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली; मात्र यावर सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी काहीच उत्तर दिले नाही. शेवटी सभागृहातील भाजपच्या आमदारांनी आमदारांचा निधी देऊन हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली. हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथे हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

डावीकडून मंगलप्रभात लोढा आणि नितेश राणे

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे केली. हा चित्रपट करमुक्त केल्यास आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण जनतेला पहाता येईल, असे त्यांनी यात म्हटले आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला संरक्षण द्यावे ! – आमदार प्रवीण दटके, भाजप

स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी काही मंडळी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला विरोध करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाला महाराष्ट्रात संरक्षण देण्यात यावे, तसेच हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी १४ मार्च या दिवशी विधान परिषदेत केली. विशेष सूचनेच्या अंतर्गत आमदार दटके यांनी ही मागणी केली.

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई – शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित काश्मिरी हिंदूंना महाराष्ट्रात आश्रय दिला होता, तसेच काश्मिरी हिंदूंच्या मुलांना महाराष्ट्रात शैक्षणिक आरक्षणही घोषित केले होते. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव प्रथमच जगासमोर आणले जात आहे. हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी अन् काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी कळकळीची मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयातही देण्यात आले आहे.

काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदु जनजागृती समिती १५ वर्षांपासून कार्यरत !

जिहादी आतंकवादामुळे उद्ध्वस्त झालेले काश्मिरी हिंदू (फॅक्ट प्रदर्शनातील संग्रहित छायाचित्र)

हिंदु जनजागृती समितीने गेल्या १५ वर्षांत काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारावर आधारित ‘दहशतवादाचे भीषण सत्य’ हे फलकप्रदर्शन ५०० हून अधिक ठिकाणी लावले आहे. याखेरीज ‘एक भारत अभियान : चलो कश्मीर कि ओर’ या अभियानांतर्गत अनेक राज्यांत सभा घेऊन १० लाखांहून अधिक हिंदूंना जागृत करण्यात आले आहे. समितीच्या वतीने काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडणार्‍या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी ऑनलाईन विशेष संवादही नुकताच आयोजित करण्यात आला होता. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळेपर्यंत हिंदु जनजागृती समिती लढत राहील, असा निर्धारही हिंदु जनजागृती समितीचे श्री. घनवट यांनी व्यक्त केला.