सातारा, १३ मार्च (वार्ता.) – महिला सुरक्षेचा आधुनिक दृष्टिकोनातून विचार करून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात ‘महिला सुरक्षा पथदर्शी’ उपक्रम राबवण्यात येत आहे. सातारा येथे या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येणार आहे. ११ मार्च या दिवशी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.
गतवर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पथदर्शी उपक्रमाच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले होते. सातारा पोलीस दलाने पथदर्शी उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला.
१. महिलांसाठी असलेल्या कायद्यांविषयी जागृती, पोलिसी कार्यपद्धतीत सुधारणा आणि सामान्य महिलांना स्वरक्षणाचे धडे यांवर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.
२. महिला आणि बाल अत्याचारांच्या घटनांमध्ये वेगाने अन्वेषण करणे, आरोपींना तातडीने अटक करणे, लवकर आरोपपत्र प्रविष्ट करणे, आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच पीडित महिला अन् बालकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे यांसाठी सातारा पोलीस दलाने गांभीर्याने पावले उचलली.