अनधिकृत गोष्टींना प्रोत्साहन देणारे राज्यकारभार काय करणार ? – संपादक
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – मुंबईमध्ये विमानतळ, रेल्वे, बी.बी.डी. चाळ आदी ठिकाणी सर्वत्र झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांना आताचाच इतिहास नाही, तर ७० वर्षांचा इतिहास आहे. या झोपडपट्ट्या हटवण्याचा प्रयत्न केल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होईल. २०-४० मुडदे पडले, तरी मुंबईतील झोपडपट्टी हटवू शकत नाही, असे वक्तव्य गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ८ मार्च या दिवशी अर्ध्या घंट्याच्या चर्चेच्या अंतर्गत शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर आव्हाड यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘नोटबंदी आणि कोरोना यांत कोलमडलेल्या आर्थिक स्थितीमुळे मुंबईतील ५२३ प्रकल्प बंद पडले आहेत. अंलमबजावणी संचालनालयाच्या कारवाईमुळे २०, सुरक्षेच्या व्यवस्थेमुळे ६, प्रदूषणाच्या समस्येमुळे १३, पर्यावरणाच्या समस्येमुळे ४ असे प्रकल्प अडकले आहेत. मुख्यमंत्र्यांची अनुमती असेल, तर काही दिवसांत सर्वांना अभिमान वाटेल, असा प्रकल्प आणू. येत्या आठवड्याभरामध्ये ‘कामाठीपुरी’ हा गृहनिर्माण आणण्यात येणार आहे. ‘शिवशाही’ हा गृहनिर्माण प्रकल्प प्रगती करू शकला नाही. यापुढे तो चालवणे शक्य नाही. या प्रकल्पाचा ५०० कोटी रुपयांचा निधी झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.’’