(म्हणे) ‘आता देशात संपूर्ण क्रांती आणायची आहे !’ – अरविंद केजरीवाल

पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाची पाळेमुळे ‘आप’ कशी खणून काढणार ?, हेही त्याने जनतेला सांगितले पाहिजे ! – संपादक

अरविंद केजरीवाल

नवी देहली – पंजाबच्या लोकांनी कमालच केली. हा निकाल, म्हणजे एक मोठी क्रांतीच आहे. शिरोमणी अकाली दलाचे सुखबीरसिंह बादल, कॅप्टन अमरिंदर सिंह, चरणजीतसिंह चन्नी, प्रकाशसिंह बादल, नवज्योतसिंह सिद्धू आणि विक्रमसिंह मजिठिया या मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. ही एक मोठी क्रांती आहे. हा आम आदमी पक्ष आहे. याला आव्हान देऊ नका. देशाची ७५ वर्षे वाया गेली आहेत, आणखी वर्षे वाया घालवायची नाहीत. आता देशात संपूर्ण क्रांती आणायची आहे. देहली आणि पंजाब येथून ही क्रांती संपूण देशात पसरेल. सर्व महिला, युवा आणि शेतकरी यांनी ‘आप’मध्ये यावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवराल यांनी पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाला मिळालेल्या बहुमतानंतर केले आहे. ते त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

केजरीवाल पुढे म्हणाले की,

१. पंजाबमध्ये आम्हाला अत्यंत मोठा विजय मिळाला आहे. आता लोकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे अहंकारात रूपांतर होऊ द्यायचे नाही.

२. काही लोक मला शिव्या देतात. केजरीवाल काळा आहे, केजरीवाल आतंकवादी आहे; पण आम्ही त्यांना कधीच शिव्या देणार नाही. आम्ही उद्धटपणा करणार नाही. आपण शिव्यांचे उत्तर शिव्याने देणार नाही. जे तुम्हाला शिव्या देतील त्यांना तुम्ही इतकेच सांगा, ‘तुमच्या शिव्या तुम्हालाच आहेत; आम्हाला त्या मान्य नाहीत.’

३. आज आपल्या मुलांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जावे लागते; पण आपण असा भारत निर्माण करायचा आहे, येथे सर्व मुलांना शिक्षण मिळेल.