अमरनाथ येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग सिद्ध होते. भगवान शिवाने देवी पार्वतीला या गुहेमध्ये अमरत्वाचा मंत्र दिला होता, हे या गुहेचे महत्त्व आहे. साक्षात् भगवान शिवाचे या गुहेमध्ये अस्तित्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पार्वतीदेवीला अमरकथा सांगण्यासाठी घेऊन जात असतांना भगवान शिवाने वाटेमध्ये प्रथम स्वत:चे वाहन नंदीचा त्याग केला. यानंतर चंदनबाडी येथे स्वत:च्या जटेमधून चंद्राला मुक्त केले. शेषनाग येथील एका तलावावर पोचल्यानंतर त्यांनी गळ्यातून साप काढले. आपल्या प्रिय पुत्र गणपतीला त्यांनी महागुणस पर्वतावर सोडले. नंतर पंचतरणी या ठिकाणी जाऊन भगवान शिवाने पाचही तत्त्वांचा त्याग केला. एका मान्यतेनुसार राखीपौर्णिमेच्या दिवशी साक्षात् भगवान शिवाचे अमरनाथ गुहेमध्ये आगमन होते.