१. शिव हा शब्द ‘वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. ‘वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो.
२. शिव म्हणजे मंगलमय अन् कल्याणस्वरूप असे तत्त्व.
३. शिव म्हणजे ब्रह्म अन् परमशिव म्हणजे परब्रह्म.
आज्ञाचक्राचा अधिपती
शिव आज्ञाचक्राचा अधिपती आहे. शिव आदिगुरु आहे. गुरुसेवेत असलेल्या शिष्याचा ‘आज्ञापालन’ हा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. अशा दृष्टीने आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेले शिवाचे स्थान हे एकप्रकारे शिवाच्या गुरुत्वाचीच साक्ष देते. शिवाचा तृतीय नेत्र (ज्ञानचक्षू) असण्याचे स्थानही तेच आहे.