व्यक्तीला होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणेच आवश्यक !

मनुष्याच्या जीवनात येणार्‍या ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे आलेल्या असतात. या समस्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक विकार हेही येतात. या विकारांचे कारण ८० टक्के आध्यात्मिक असल्याने हे विकार मुख्यतः आध्यात्मिक स्तरावरील उपायांनीच बरे होणारे असतात. हे आध्यात्मिक स्तरांवरील उपाय, म्हणजे प्राणशक्तीवहन पद्धतीने त्या रुग्णासाठी शोधून काढलेली मुद्रा, न्यास आणि नामजप हे आहेत. विकार होण्याची विविध आध्यात्मिक कारणे कोणती ? आणि त्यांच्यावर आध्यात्मिक स्तरांवरील उपाय कसे लागू पडतात ? हे आता आपण पाहू.

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

१. विकार होण्याची आध्यात्मिक कारणे आणि त्यांवरील उपाय

१ अ. वाईट शक्तींनी त्रास देणे

१ अ १. लक्षणे

अ. शारीरिक : कारण नसतांना अशक्तपणा जाणवणे (प्राणशक्ती न्यून होणे), शारीरिक वेदना होणे, डोके जड होणे, चक्कर येणे, मळमळणे, भूक न लागणे, शरिराच्या विविध भागांमध्ये (डोळे, पोट इत्यादींमध्ये) विकार निर्माण होणे; गळा दाबल्यासारखे वाटणे किंवा छातीवर दाब जाणवणे; मान किंवा कंबर आखडणे; केसांत वारंवार उवा होणे; औषधोपचार आणि पथ्यपाणी कित्येक मास (महिने) करूनही विकार बरे न होणे इत्यादी.

आ. मानसिक : कारण नसतांना एखाद्याचा राग येणे आणि चिडचिड होणे; मनात नकारात्मक वा निराशेचे विचार येऊन मन अस्वस्थ होणे; सतत तणावात असणे; अती भित्रेपणा; निरुत्साह जाणवणे; स्वतःच्या इच्छा आणि स्वतःला इतरांकडून असणार्‍या अपेक्षा यांमध्ये अचानक वाढ होणे इत्यादी.

१ अ २. कारणे

१ अ २ अ. साधना न करणे आणि स्वभावदोष अन् अहं यांचे प्रमाण पुष्कळ असणे : सध्या कलियुग असल्याने धर्माचरणाचा र्‍हास झाला आहे. त्यामुळे वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे. धर्माचरणाचा र्‍हास होण्याची कारणे, म्हणजे बहुतांश लोक साधना करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये स्वभावदोष अन् अहं यांचे प्रमाण पुष्कळ असते. अशा व्यक्ती ईश्वरी तत्त्वापासून दूर जातात. ईश्वरी तत्त्वाच्या न्यूनतेमुळे अशा व्यक्तींना त्रास देणे वाईट शक्तींना सोपे जाते. अशा व्यक्तींमध्ये वाईट शक्ती स्वत:चे स्थानही निर्माण करू शकतात. मनुष्यात स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण जेवढे अधिक, तेवढा त्यांना होणारा वाईट शक्तींचा त्रास अधिक (तीव्र) असतो.

१ अ २ आ. समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे) : सनातनचे साधक ‘ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाज सात्त्विक व्हावा’, या उद्देशाने समाजाकडून साधना करवून घेण्याचा प्रयत्न (समष्टी साधना) करत आहेत. समाज साधना करू लागला की, तो धर्माचरणी होऊन ईश्वरी राज्य आपोआपच येते. वाईट शक्तींना नेमके हे नको असते; म्हणून त्या समष्टी साधना करणार्‍या सनातनच्या साधकांना वारंवार त्रास देत आहेत. सनातनच्या साधकांव्यतिरिक्त समाजात समष्टी साधना करणारे जे अन्य थोडेफार लोक आहेत, त्यांनाही वाईट शक्ती त्रास देत आहेत. या सर्वांना होणारे बहुतांश त्रास व्यक्तीगत कारणांमुळे होत नसून ते समष्टी साधना करत असल्याने होत असतात.

१ अ २ इ. वाईट शक्तींनी पंचतत्त्वांच्या स्तरावर मनुष्याच्या देहावर आक्रमणे करून देहातील पंचतत्त्वांचा समतोल बिघडवणे : मनुष्याचा देह हा पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांनी बनलेला आहे. वाईट शक्ती पंचतत्त्वांच्या स्तरावर मनुष्याच्या देहावर आक्रमणे करून देहातील पंचतत्त्वांचा समतोल बिघडवतात.

१ अ ३. उपाय

१ अ ३ अ. ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार उपाय करण्याची आवश्यकता : वाईट शक्ती एखाद्या व्यक्तीत बीजस्वरूपात स्वतःचे स्थान निर्माण करतात आणि नंतर त्या स्थानामध्ये त्रासदायक शक्ती (काळी शक्ती) प्रक्षेपित करून ती साठवून ठेवतात. या त्रासदायक शक्तीमुळे ‘प्राणशक्तीवहन संस्थे’त अडथळा निर्माण होतो. मानवाच्या स्थूलदेहात रक्ताभिसरण, श्वसन, पचन इत्यादी विविध संस्था कार्यरत असतात. त्यांना, तसेच मनाला कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती ‘प्राणशक्तीवहन संस्था’ पुरवते. तिच्यात एखाद्या ठिकाणी अडथळा आल्यास संबंधित इंद्रियाची कार्यक्षमता अल्प झाल्याने विकार निर्माण होतात. या विकारांवर आध्यात्मिक उपाय म्हणजे ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने शोधून काढलेली मुद्रा, न्यास आणि नामजप हे आहेत.

(‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ची सविस्तर माहिती सनातनचे ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?’ आणि ‘प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय’ यांमध्ये दिली आहे.’ – संकलक)

१ अ ३ आ. मुद्रा, न्यास आणि नामजप यांचे महत्त्व

१ अ ३ आ १. मुद्रा करण्याचे महत्त्व : हाताच्या बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला किंवा बोटे एका विशिष्ट प्रकारे जुळवली की, वेगवेगळ्या प्रकारचे आकृतीबंध बनतात. या आकृतीबंधांना ‘मुद्रा’ असे म्हणतात. मनुष्याचा देह हा पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांनी (पंचमहाभूतांनी) बनलेला आहे. विशिष्ट मुद्रा पंचतत्त्वांशी संबंधित असतात.

१ अ ३ आ २. मुद्रेसहित नामजप करण्याचे महत्त्व : वाईट शक्ती पंचतत्त्वांच्या स्तरावर मनुष्याच्या देहावर आक्रमणे करतात. प्रत्येक देवतेचे कोणत्या ना कोणत्या तरी महाभूतावर आधिपत्य असते. त्या त्या महाभूताच्या स्तरावरील आक्रमण परतवून लावण्यासाठी त्या त्या महाभूतावर आधिपत्य असलेल्या देवतेचा नामजप आणि त्या त्या महाभूताशी संबंधित मुद्रा करणे उपयुक्त ठरते.

१ अ ३ आ ३. मुद्रा करून तिने शरिरावर न्यास करण्याचे महत्त्व : हाताच्या बोटांची विशिष्ट मुद्रा करून ती शरिराचे कुंडलिनीचक्र किंवा अन्य एखादा भाग यांच्या जवळ धरणे, याला ‘न्यास’ म्हणतात. न्यास शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून करायचा असतो. मुद्रेद्वारे ग्रहण होणारी सकारात्मक (पॉझिटिव्ह) शक्ती संपूर्ण शरीरभर पसरते, तर न्यासाद्वारे ती सकारात्मक शक्ती शरिरात विशिष्ट स्थानी प्रक्षेपित करता येते. थोडक्यात न्यासामुळे त्रासाशी निगडित स्थानी ही शक्ती अधिक प्रमाणात प्रक्षेपित करता आल्यामुळे त्रासनिवारण लवकर होण्यास साहाय्य होते.

१ अ ३ आ ४. प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळा शोधणे, म्हणजे न्यास करण्याचे स्थान (न्यासस्थान) शोधणे : प्राणशक्तीवहन संस्थेमध्ये एखादा अडथळा असल्यास त्या अडथळ्याच्या स्थानी हाताची बोटे फिरवल्यावर बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या प्राणशक्तीच्या प्रवाहामध्ये त्या अडथळ्यामुळे अवरोध उत्पन्न होऊन श्वास रोखला जातो आणि त्यावरून अडथळ्याचे स्थान अचूक शोधता येते. शोधलेल्या अडथळ्याच्या स्थानी १ – २ सें.मी. अंतरावरून न्यास करायचा असतो. त्या स्थानाला ‘न्यासस्थान’ म्हणतात. वाईट शक्ती प्रामुख्याने कुंडलिनीचक्रांवर आक्रमण करून तेथे त्रासदायक शक्ती साठवून ठेवतात. यामुळे कुंडलिनीचक्रांत अडथळे निर्माण होतात. कुंडलिनीचक्रात अडथळा आला, तर त्याच्याशी संबंधित इंद्रियाला प्राणशक्ती अल्प प्रमाणात मिळून आरोग्य बिघडते. हा अडथळा दूर करण्यासाठी कुंडलिनीचक्रांच्या स्थानी बोटे फिरवून न्यास करण्यासाठीचे अडथळा असणारे स्थान शोधणे आवश्यक असते. तसेच शरिरातील विविध नाड्यांतील अडथळाही शोधून काढावा लागतो. त्यासाठी चक्रस्थाने सोडून शरिराच्या डोके, मान, छाती, पोट, हात, पाय इत्यादी सर्व भागांवर सर्व बाजूंनी बोटे फिरवून ‘कुठे अडथळा आहे का ?’, हेही शोधावे लागते.

१ आ. अतृप्त पूर्वजांनी त्रास देणे

सध्या एकत्र कुटुंबपद्धत राहिली नसल्याने वडीलधार्‍यांचा आदर राखण्याचा संस्कार लोप पावत चालला आहे. एवढेच नव्हे, तर बरेच जण आपल्या आई-वडिलांनाही नीट वागवत नाहीत. अशा वडीलधार्‍यांच्या निधनानंतर त्या पूर्वजांचा शाप त्या कुटुंबाला लागतो. तसेच आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञ राहून श्राद्ध, पक्ष इत्यादी करणे सध्या अनेकांकडून होत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना अतृप्त पूर्वजांचा त्रास हाेतो. अतृप्त पूर्वजांच्या त्रासामुळे गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, मूल अपुर्‍या दिवसांचे जन्मणे, मतिमंद किंवा विकलांग अपत्य जन्मणे, ही त्रासाची काही लक्षणे त्या कुटुंबात आढळतात. तसेच काहींना व्यसन, मनाचे विकार, त्वचाविकारासारख्या शारीरिक व्याधी अशीही लक्षणे असू शकतात. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप करणे उपयुक्त ठरते.

या त्रासांच्या मूळ कारणावर उपाय म्हणून दत्ताचा नामजप सांगण्यासमवेतच त्या त्रासांवर प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसारही उपाय सांगितल्यास अधिक लाभ होतो.

२. उपाय करतांना लक्षात आलेली विविध सूत्रे

२ अ. उपाय करतांना प्रथम शरिरावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे आवश्यक असणे

वाईट शक्ती एखाद्याला त्रास देतांना त्रासदायक शक्ती प्रक्षेपित करून व्यक्तीच्या एखाद्या कुंडलिनीचक्रावर आवरण आणतात. मग ते वाढवून तिच्या शरिरावर बाहेरूनही (शरिराभोवती) आवरण आणतात. व्यक्तीवर आवरण आल्यामुळे तिला आधीच असलेले त्रास आणखीन वाढतात. तसेच व्यक्तीवर त्रासदायक आवरण आले असेल, तर तिने शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासांच्या निर्मूलनासाठी कितीही वेळ नामजपादी उपाय केले, तरी आवरणामुळे त्या उपायांची सात्त्विक स्पंदने तिच्यापर्यंत तेवढ्या प्रमाणात पोचत नाहीत अन् त्यामुळे तिच्या त्रासांचे निवारण लवकर होत नाही. व्यक्तीवर त्रासदायक आवरण आले असेल, तर तिच्यावर वैद्यकीय उपचारांचाही विशेष परिणाम होत नाही; म्हणून हे आवरण काढणे आवश्यक असते.

२ आ. त्रास पूर्णपणे दूर होईपर्यंत प्राणशक्तीवहनातील अडथळ्याचे स्थान पुनःपुन्हा शोधून तेथे उपाय करणे आवश्यक असणे

न्यासस्थान शोधून तेथे उपाय केल्यावर त्या स्थानातील अडथळा (त्रास) दूर झाल्याचे जाणवते. त्यानंतर ‘प्राणशक्तीवहनामध्ये अडथळा असणारे अन्य स्थान कोणते आहे का ?’, हे पुन्हा शोधावे लागते आणि ते सापडल्यास त्या स्थानावर पुन्हा उपाय करावे लागतात. तेव्हा त्या स्थानासाठी मुद्रा आणि नामजप हेही पुन्हा शोधावे लागतात. अशा प्रकारे पुनःपुन्हा ही प्रक्रिया करून ‘प्राणशक्तीवहनामध्ये आणखी कुठे अडथळा नाही ना ?’, याची निश्चिती करावी लागते, तरच त्रास पूर्णपणे दूर होतो. वाईट शक्तींनी एकापेक्षा अधिक चक्रस्थानी आक्रमण करून तेथे त्रासदायक शक्ती साठवलेली असते. त्यामुळे ती सर्व स्थाने शोधून आणि त्यांवर उपाय करून तेथील त्रासदायक शक्ती दूर करावी लागते. आपण एखाद्या स्थानी उपाय करू लागलो की, आपल्याला वाटते, ‘तेथील त्रास दूर झाला आहे’; पण तेव्हा खरेतर वाईट शक्तींनी आपल्याला फसवण्यासाठी त्यांचे स्थान पालटलेले असते. त्यामुळेही अडथळ्याचे स्थान पुनःपुन्हा शोधावे लागते.

२ इ. सूक्ष्मातून वाईट शक्तींच्या आक्रमणाची चाल जाणून त्याप्रमाणे उपाय करणे आवश्यक

एकदा एक साधक मुद्रा, न्यास आणि नामजप शोधून स्वतःसाठी उपाय करत होता. दोन घंटे झाले, तरी त्याला ‘त्याचा त्रास न्यून झाला आहे’, असे जाणवले नाही. त्यामुळे त्याने मला कळवले. मी उपाय शोधू लागल्यावर मला जाणवले, ‘वाईट शक्ती त्याच्या डोक्यावर वरून त्रासदायक शक्तीचा प्रवाह सतत सोडत आहे. त्यामुळे त्या साधकाने कितीही वेळ उपाय केले, तरी त्याच्यातील त्रासदायक शक्ती अल्प होत नव्हती.’

एकदा एक साधक स्वतःसाठी उपाय करत असतांना त्याच्या समोर वाईट शक्तींनी त्रासदायक (काळ्या) शक्तीचा पडदा निर्माण केला होता. त्यामुळे त्याचा त्रास अल्प होत नव्हता. आणखी एक साधक स्वतःसाठी उपाय करत असतांना त्याच्यावर भूमीच्या दिशेकडून पाताळातून त्रासदायक शक्ती येत होती. त्यामुळे त्याचाही त्रास अल्प होत नव्हता. उपाय करतांना त्रास दूर होण्यासाठी अशा प्रकारे सूक्ष्मातून वाईट शक्तींच्या आक्रमणाची दिशा जाणून त्याप्रमाणे उपाय करणे आवश्यक असते.

२ ई. उपायांच्या शेवटी आपल्या डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे अत्यंत आवश्यक

उपाय करतांना आपल्या सर्व चक्रांवरील त्रासदायक (काळी) शक्ती पूर्णपणे दूर झाली, तरी शेवटी आपल्या डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक असते, नाहीतर वाईट शक्तींना आपल्यावर आक्रमण करायला ते स्थान आयतेच मिळते. आपण आपल्या डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करू लागलो की, आपल्या शरिरात थोडीफार शिल्लक राहिलेली त्रासदायक शक्तीही त्या स्थानातून खेचून घेतल्याप्रमाणे बाहेर पडते. त्यामुळे आपल्याला आणखी हलके वाटते. कधी कधी डोळ्यांतून त्रासदायक शक्ती बाहेर काढतांना आपल्याला आपल्या एखाद्या चक्रावर दाब जाणवून त्रास वाढल्याचे जाणवते. तेव्हा वाईट शक्तींनी तिच्या त्या स्थानात दडवून ठेवलेली (निर्गुण स्तरावर ठेवलेली) त्रासदायक शक्ती प्रकट होते. त्यामुळे त्या स्थानावर आपल्याला उपाय करता येतात. आपल्या डोळ्यांतून त्रासदायक शक्ती निघून गेल्यावर आपल्या डोळ्यांना हलके वाटते आणि आपल्याला स्वच्छ दिसू लागते. असे झाल्यावर आपण उपाय पूर्ण झाल्याचे समजू शकतो. डोळ्यांवर उपाय करण्याचा हाही एक लाभ असतो.

३. सारांश

अशा रितीने अचूक आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आपल्याला होणार्‍या त्रासांवर मात करता येऊ शकते. त्रासाच्या तीव्रतेनुसार त्रास दूर होण्याचा कालावधी अल्प-अधिक असू शकतो. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर चालू असलेला औषधोपचार, मानसोपचार इत्यादी कोणत्याही उपचाराचा पूर्णपणे आणि अल्प कालावधीत लाभ होतो. आपले त्रास नामजपादी उपायांनी बरे झाल्याने आपली देवतांप्रती श्रद्धा आणखी वाढण्यास साहाय्य होते. तसेच साधना करण्याचे जीवनातील महत्त्व आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या लाभामुळे दृढ होते. ‘अशा प्रकारे असलेले आध्यात्मिक उपायांचे महत्त्व सर्वजणांच्या लक्षात येऊ दे’, अशी मी श्रीगुरुचरणी प्रार्थना करतो.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्. डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.१.२०२२)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक