कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींपैकी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, श्री. सचिन अंधुरे आणि श्री. समीर गायकवाड यांना दोषमुक्त करण्यासाठी आम्ही न्यायालयात आवेदन सादर केले आहे. याचसमवेत ‘आरोप निश्चितीच्या आधी सरकार पक्षाकडून आम्हाला काही कागदपत्रे आणि काही ‘इलेक्ट्रॉनिक पुरावा’ मिळालेला नाही’, तसेच ‘अन्य ज्या गोष्टी सरकारी पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या नाहीत, त्या आम्हाला मिळाव्यात’, असे आवेदन आम्ही १८ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात प्रविष्ट केले आहे, अशी माहिती अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकारांना दिली. कॉ. गोविंद पानसरे प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर चालू असून पुढील सुनावणी २ मार्च या दिवशी होणार आहे.
खटला चालण्यास झालेल्या विलंबाची भरपाई सरकार पक्ष कशी करणार ?कॉ. पानसरे प्रकरणाचे एकूणच जे अन्वेषण झाले, ते दिशाहीन आणि भरकटलेले आहे. या प्रकरणी वर्ष २०१६ मध्येच आम्ही खटला चालवण्यासाठी आग्रही होतो. त्या वेळी सरकार पक्ष आणि पोलीस उच्च न्यायालयात गेले आणि ‘खटला चालवू नये’, अशी मागणी केली. त्यामुळे हा खटला गेली ५ वर्षे रखडला आहे. ‘आता लगेच हा खटला चालू करा’, अशी मागणी करतांना यासाठी जी ५ वर्षे वाया गेली, त्याची भरपाई सरकार पक्ष कशी करणार आहे ? त्यासाठीचे प्रायश्चित्त त्यांनी घ्यायला हवे, अशी मागणी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. या संदर्भात सरकारी अधिवक्ता शिवाजीराव राणे म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाच्या वतीने मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता आम्ही लवकरच करू, तसेच वरील तीन आरोपींच्या विरोधात सरकार पक्षाकडे पुरेसे पुरावे आहेत.’’ |