पत्नी हट्ट करत असेल, तर पतीने तिला चोपावे !

मलेशियातील महिला मंत्र्याचा ‘सल्ला’ !

मलेशिया एक इस्लामी राष्ट्र आहे आणि सल्ला देणार्‍याही मुसलमान महिला आहेत. याविषयी भारतातील पुरो(अधो)गामी, स्त्रीवादी आणि निधर्मीवादी काही बोलतील का ? – संपादक

मलेशियातील महिला, कुटुंब आणि सामुदायिक विकास खात्याच्या उपमंत्री सिती जैला महंमद युसॉफ

कुआलालंपूर (मलेशिया) – जर पत्नी हट्ट करत असेल आणि अयोग्य वागत असेल, तर तिला समजावून सांगितले पाहिजे. तरीही ती ऐकत नसेल, तर ३ दिवस तिच्या समवेत शारीरिक संबंध ठेवू नयेत. तरीही तिच्यात पालट होत नसेल, तर पतीने कठोर होऊन तिला चोपले पाहिजे, ज्यामुळे पत्नी शिस्तीत राहू शकेल, असे विधान मलेशियातील महिला, कुटुंब आणि सामुदायिक विकास खात्याच्या उपमंत्री सिती जैला महंमद युसॉफ यांनी केले आहे. त्यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून हे विधान केले आहे. याला त्यांनी ‘मदर टिप्स’ (आईचे सल्ले) असे म्हटले आहे. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

सिती जैला युसॉफ यांनी पुढे असेही म्हटले आहे की, जर महिलांना पतीचे मन जिंकायचे असेल, तर पतीच्या अनुमतीविना काहीही बोलू नये. जेव्हा पती शांत असेल, तेव्हाच पत्नीने बोलावे, उदा. जेवण झाले असेल, प्रार्थना केली असेल किंवा विश्रांती घेत असेल, तेव्हा अनुमती घेऊन पतीशी बोलावे.