नोंद
पिंपरी (पुणे) पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी दिलीप खंदारे यांनी ‘क्रिप्टो करन्सी’साठी (आभासी चलनासाठी) गुन्हेगारांच्या साहाय्याने नुकतेच एका व्यक्तीचे अपहरण केले. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ।’ हे ब्रीदवाक्य असलेला पोलीस विभाग गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी कृत्य, लैंगिक अत्याचार, तक्रारदारांची फसवणूक, लाचखोरी, बेशिस्त वर्तन, हत्या किंवा हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांच्या दलदलीत बुडत आहे. त्यामुळे ‘पोलीस विभागात असे पोलीस भरती होतांनाच भ्रष्टाचार होत असावा’, असा संशय येणे साहजिक आहे. पोलीस विभागाने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न होणे नगण्यच आहे.
गेल्या ३ वर्षांत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर ३४ गुन्ह्यांमध्ये १२ लाचखोरीचे गुन्हे अधिकृतरित्या नोंद आहेत. पोलिसांविरोधात नोंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये ६३ जणांना अटकही झाली आहे. वेळकाळाचे बंधन नसणार्या ‘ड्युटी’ (कामाच्या वेळा), घरांची समस्या, स्थानांतरे, वरिष्ठांचे लांगूलचालन, अंतर्गत राजकारण, आजारपणाच्या देयकाचे पैसे मिळवणे अशा अनेक कामांसाठी विभागांतर्गत लाच दिली जाते. अशामुळेच काही चांगले करू पहाणार्या पोलीस कर्मचार्यांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यांचे मनोबल अल्प होऊन कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. परिणामी व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी यांच्यात वाढ होते.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले की, कौटुंबिक समस्या, आजारपण आणि ताणतणाव यांसह वैयक्तिक कारणांमुळे २५ अधिकार्यांपैकी १४ जणांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हे रोखण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करून पोलीस विभागाला सक्षम करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांना सोयीसुविधा द्यायलाच हव्यात; पण कर्तव्यचुकार आणि गुन्हेगारी वृत्तीच्या पोलिसांना बडतर्फ करणे, त्यांच्या जागी राष्ट्रभक्त आणि कर्तव्यनिष्ठ पोलिसांची नियुक्ती करणे, हे प्राधान्याचे आहे. नागरिकांचा पोलिसांवरील हरवत चाललेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. राजकीय दबावाखाली न फसता पोलिसांनी त्यांची खरी शक्ती दाखवून द्यायला हवी. काही पोलीस धैर्याने काम करून गुन्हेगारीला मुळासकट संपवतात, असे अनेक चित्रपटांतून दाखवले जाते. हे काल्पनिक चित्र सत्यात उतरवण्यासाठी कर्तव्यनिष्ठ पोलिसांचे मोठ्या संख्येत संघटन व्हायला हवे. त्यामुळे अधर्मी आणि कर्तव्यचुकार पोलिसांवर वचक बसेल, तसेच पोलीस विभागातील गुन्हेगारीही थांबेल.
– श्री. अमोल चोथे, पुणे